‘ऐतिहासिक किल्ले सुभानमंगळ शासनाच्या ताब्यात द्या’
19 रोजी किल्ले सुभानमंगळ वर शिरवळकरांचे लाक्षणिक उपोषण...
सातारा (महेश पवार) :
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी ०८/०८/१६४८ रोजी पहिली लढाई करून किल्ले सुभानमंगळ जिंकून ताब्यात घेतला होता व स्वराज्य स्थापनेचा पाया रचला होता . किल्ले सुभानमंगळ या ऐतिहासिक लढाई ची नोंद आज देखील शिवकालीन सर्व ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये, पुस्तकामध्ये आढळून येते , मात्र सुभानमंगळ किल्ल्यांचा सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिलेल्या इतिहास पुसला जाण्याची भिती वाटू लागली.
याचे कारण म्हणजे जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेला किल्ले सुभानमंगळ हा आज खाजगी लोकांच्या अस्थापनाच्या ताब्यात चालला असून या किल्ल्यावर खाजगी अतिक्रमण, उत्खनन होत असून यातुन किल्ल्याचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे .या ऐतिहासिक सुभानमंगळचे जतन व्हावे व शिवरायांचा इतिहास पुसला जाऊ नये अशी शिरवळ पंचक्रोशीतील नागरिकांनी तसेच जिल्ह्यातील शिवप्रेमींची मागणी असून अनेकदा पुरातत्व विभागाकडे लेखी तक्रार दिल्यानंतर आयुक्त पुरातत्व विभाग यांच्या कडून जिल्हाधिकारी सातारा यांना किल्ले सुभानमंगळ ताब्यात घेण्या संदर्भात निर्देश देऊन देखील जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शिरवळ येथील सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य कांबळे यांच्या नेतृत्वाखाली किल्ले सुभानमंगळ येथे शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.