गोवा

‘तुये इस्पितळाच्या कार्यक्षेत्रात लवकरच वैद्यकीय महाविद्यालय’

पेडणे: उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. तुये येथील १०० खाटांच्या सरकारी इस्पितळाच्या कार्यक्षेत्रात आता लवकरच वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. या निर्णयामुळे केवळ पेडणे तालुक्यातील आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारणार नसून, स्थानिक तरुणांसाठी वैद्यकीय शिक्षणाची मोठी दारे खुली होणार आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, तुये रुग्णालय हे आता ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालय’ (गोमेकॉ) शी संलग्न झाले असून, २ फेब्रुवारी २०२६ पासून या ठिकाणी बाह्य रुग्ण विभागाच्या (OPD) सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता या परिसराचा अधिक विस्तार करून तिथे अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे सरकारचे मानस आहे. पेडणे तालुक्यातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा दारात उपलब्ध व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लांब जावे लागू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

तुये हॉस्पिटलमध्ये सध्या १३ विविध बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आले असून, यात औषधशास्त्र, शस्त्रक्रिया, अस्थिरोग, स्त्रीरोग आणि बालरोग यांसारख्या महत्त्वाच्या सेवांचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे येथे केवळ रुग्णांवर उपचारच होणार नाहीत, तर संशोधनासाठी (Research Centre) देखील विशेष केंद्र उभारले जाईल. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इतर नामांकित संस्थांच्या सहकार्याने येथे प्रगत आरोग्य संशोधन केले जाणार आहे.

पेडणे तालुका हा वेगाने विकसित होत असून मोपा विमानतळ आणि आयुष इस्पितळानंतर आता हे वैद्यकीय महाविद्यालय तालुक्याच्या विकासात मैलाचा दगड ठरेल. “या प्रकल्पामुळे पेडणे तालुक्यातील आरोग्य आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयाचे पेडणेवासीयांकडून स्वागत होत असून, गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला तुये हॉस्पिटलचा प्रश्न आता पूर्णपणे मार्गी लागला आहे.

Goa GMC hostpital

तत्पूर्वी, तुये सरकारी इस्पितळ व संशोधन केंद्र गोमेकॉला लिंक करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते आज या हॉस्पिटलाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर यांच्यासहीत स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) सुमारे ८५ कोटी रुपये खर्च करून ही हॉस्पिटल इमारत उभारली आहे. एकूण १०० खाटांचे इस्पितळ आहे. यात १३ ओपीडी असणार असून, गोमेकॉतून सुविधा पुरवून कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!