‘पाण्याच्या टंचाईमुळे सरकारची अकार्यक्षमता, गैरव्यवस्थापन उघड’
पणजी :
राज्यात अनेक गावे आणि शहरांमध्ये भेडसावणाऱ्या पाण्याच्या टंचाईने भाजप सरकारची अकार्यक्षमता आणि राजकिय इच्छाशक्तीचा अभाव उघड झाला आहे, असे काँग्रेसचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर म्हणाले.
नागरिकांना दररोज 4-5 तास पाणी देता येत नसेल, तर राजकीय बाजू ही यंत्रणा चालवण्यास सक्षम नसल्या सारखे दर्शवतो, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी विधान केल्यावर, त्याला प्रतिक्रिया देताना पणजीकर म्हणाले की, राजकीय अकार्यक्षमतेमुळे जनता त्रस्त आहे.
“ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘हर घर जल’ प्रमाणित करणारे पहिले राज्य बनल्याबद्दल गोवा सरकारचे अभिनंदन केले होते. याचा अर्थ गोव्यातील प्रत्येक घराला पाईपने पाणी जोडण्यात आले. पण पाणीच नाही तर अशा कनेक्शनचा उपयोग काय, असा सवाल पणजीकर यांनी केला.
“प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मग ती स्थानिक स्वराज्य संस्था असो, विधानसभा असो की लोकसभा असो, भाजप नेहमीच 24 तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देते. मात्र अकार्यक्षमता आणि गैरवेवस्थापन कारभारामुळे ही आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत. आता त्यांनी कर्नाटकात भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी मदत केली असून, यासाठी म्हादईच्या पाण्याशी तडजोड केली आहे. भविष्यात आम्हाला पाणी मिळणार नाही आणि म्हादई विकण्याच्या या कृत्याला फक्त भाजपच जबाबदार असेल, असे पणजीकर म्हणाले.
ते म्हणाले की, सरकारने त्यांची अपयश लपवण्यासाठी कारणे सांगू नये, त्याऐवजी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काम करावे. “राज्यात ठिकठिकाणी पाणी साठवण्यासाठी जलाशयांची गरज आहे, याची जाणीव या सरकारला नव्हती का? मग काम का सुरू केले जात नाही, असा सवाल पणजीकर यांनी केला.
ही बाब जनतेने सरकारच्या निदर्शनास आणून देऊन आणि पाण्यासाठी अनेकदा आंदोलने करूनही सरकारने या प्रश्नाकडे डोळेझाक केल्याने जनतेला आणखी त्रास सहन करावा लागत असल्याचे अमरनाथ पणजीकर म्हणाले.