
गोवा
गोवा पोलिसांचा होणार ‘स्वाभिमान’ सन्मान
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार गोविंद गावडे यांची विशेष उपस्थिती
पणजी (प्रतिनिधी) :
जनसुरक्षा आणि कायद्याच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस दलाचा यथोचित सन्मान गेल्या पाच वर्षांपासून राजेश्री क्रिएशन्स ‘स्वाभिमान सन्मान’ देऊन करत आहे. याही वर्षी गोवा राज्य सरकारच्या सहकार्याने राजेश्री क्रिएशनने ‘स्वाभिमान’ सन्मान संध्येचे आयोजन केले असून, शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी कला अकादमीच्या दर्या संगम येथे हा विशेष कार्यक्रम होणार आहे.
‘राजेश्री क्रिएशन’चे संचालक परेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला गोवा राज्य सरकारचे विशेष सहकार्य लाभले असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर प्रियोळचे आमदार आणि माजी कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांची सन्माननीय उपस्थिती यावेळी असणार आहे.
२१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या ‘स्वाभिमान’ सन्मानसंध्येमध्ये हवालदार पासून ते पोलीस संचालकांपर्यंत राज्यातील निवडक ४४ पोलिसांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी याचा अवश्य लाभ घेत पोलिस दलाप्रतिची आपली सन्मान्य भावना दाखवून द्यावी असे आवाहन राजेश्री क्रिएशन्सच्यावतीने परेश नाईक यांनी केले आहे.
लोकप्रिय कलाकारांचा विशेष कार्यक्रम
या सन्मानसंध्येमध्ये उपस्थितांच्या मनोरंजनासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, प्रसिद्ध गोमंतकीय कलाकार यावेळी आपली कला सादर करणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची हास्यजत्रा कार् यक्रमातील कलाकार प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव हे देखील यावेळी आपला विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत.
पोलिसांच्या मेहनतीला जनाधार देणे आणि त्यांच्याबद्दल समाजामध्ये विशेष जागरूकता निर्माण करणे, हे या सन्मानसंध्येचे मुख्य ध्येय असून, सन्मानार्थी पोलिसांना त्यांच्या कुटुंबासमवेत गौरवान्वित करण्यात येणार आहे. कारण पोलिसांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबाचे समाजासाठीचे योगदान नेहमीच पडद्यामागे राहते. त्यामुळे यानिमित्ताने पोलिसांच्या कुटुंबावरदेखील प्रकाशझोत पडेल. त्यामुळे समाज आणि पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद तयार होण्यास मदत होईल. आणि यासहित राजेश्री क्रिएशन्स हा उपक्रम गेली पाच वर्षे अत्यंत नेटाने आणि उत्साहाने करत आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले पाहिजे.– गोविंद गावडे,आमदार, प्रियोळ.

