जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती
जांबावली – श्री रामनाथ दामोदर संस्थानतर्फे १११ व्या पिंडीकोत्सवा निमीत्त बुधवार २५ मार्च २०२६ रोजी आयोजित कुशावती नदी आरती सोहळ्यास गोवा तसेच कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून आलेल्या भक्तांची भव्य उपस्थिती लाभली. “देवाचो पाणटो” येथे उभारलेल्या भव्य व कलात्मक व्यासपिठावर खास हरिद्वार येथून आलेल्या अर्चकांनी कुशावती आरतीचा अविष्कार सादर केला.
श्री रामनाथ दामोदर संस्थानचे अध्यक्ष मंजुनाथ पै दुकळे, सार्वजनीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व श्री नृसिंह गंगा आध्यात्म दीपक हरिद्वारचे राजीवजी यांच्या हस्ते पारंपरीक दीप प्रज्वलनाने “कुशावती आरती” सोहळ्याचा प्रारंभ झाला व सर्व पाहुण्यांचा संस्थानतर्फे श्री दामोदराचा प्रसाद देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी “कुशावती आरती” सोहळ्याच्या आयोजनास निस्वार्थीपणे हातभार लावणारे राजेश जांबावलीकर, दामोदर जांबावलीकर, राजेश मेस्ता, भावेश जांबावलीकर व सिद्धेश प्रभुदेसाई यांचा तसेच देवस्थानचे सेवेकरी राजेश गावकर व सतिश देशभंडारी यांचा सत्कार करण्यात आला. सोहळ्याचे सुत्रसंचालन विशाल पै काकोडे यांनी केले.
कुशावती आरती सोहळ्यानंतर गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई व भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांचा संस्थानतर्फे श्री दामोदराचा प्रसाद देवून व्यासपिठावर सन्मान करण्यात करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री दामोदराची पालखी वाजत-गाजत “देवाचो पाणटो” येथे आणण्यात आली. त्यानंतर जगदंब ढोल पथकांचे बहारदार वादन सादर करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष मंजुनाथ पै दुकळे यांनी विधीवत कुशावती नदीचे पूजन केल्यानंतर ९ अर्चकांनी धुपारती, वृक्षआरती, कर्पुर आरती यांचा लयबद्ध अविष्कार सादर करुन उपस्थित हजारो भाविकांचे डोळ्यांचे पारणे फेडले.
आज जल वाचविणे अत्यंत महत्वाचे असून, आपल्या नद्यांचा योग्य सन्मान केल्यासच आपल्या जीवनदायीनी राहतील अशी भावना मंजुनाथ पै दुकळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली व पहिल्यांदाच आयोजित कुशावती आरती कार्यक्रमास उपस्थिती लावल्याबद्दल भाविकांचे आभार मानले.


