
मडगाव नगरपालिका उद्यानातील प्रकल्पाची निविदा थांबवा : प्रभव नायक
मडगाव: मडगाव नगरपालिका उद्यानातील प्रस्तावित बांधकामाबाबत गंभीर चिंता व्यक्त करत मडगावचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी गोवा राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या अध्यक्षांना पत्र लिहून तात्काळ स्पष्टीकरण मागितले असून टेंडर प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे.
आपल्या पत्रात प्रभव नायक यांनी नमूद केले की ३.९६ कोटींच्या या प्रकल्पात विद्यमान बांधकाम पाडून तेथे दोन मजली इमारत उभारण्याचा प्रस्ताव आहे. ही जागा मडगावकरांसाठी सांस्कृतिक, धार्मिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून येथे अनेक वर्षांपासून सार्वजनिक श्री गणेशोत्सव तसेच विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात.
प्रभव नायक यांनी आज लिहीलेल्या पत्रात, सदर प्रस्तावित प्रकल्पामुळे नागरिक आणि भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंता निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे. त्यांनी प्रकल्पाचा नेमका उद्देश आणि स्वरूप, टेंडर काढण्यापूर्वी कोणताही व्यवहार्यता अभ्यास किंवा वारसा परिणाम अहवाल करण्यात आला होता का, तसेच स्थानिक नागरिक आणि गणेशोत्सव आयोजकांशी सल्लामसलत करण्यात आली होती का, याबाबत सविस्तर माहिती मागितली आहे.
प्रभव नायक यांनी पुढे नमूद केले की प्रस्तावित इमारतीचा वापर बार, रेस्टॉरंट, मसाज स्पा किंवा डान्स बार यांसारख्या व्यावसायिक उपक्रमांसाठी केला जाईल, अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. मास्टर प्लॅन २०४१ सादरीकरणावेळी नागरिकांनी अशा व्यावसायिक प्रस्तावांना तीव्र विरोध दर्शवला होता, याचीही त्यांनी आठवण करून दिली आहे.
दरम्यान, प्रभव नायक यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याना स्वतंत्र निवेदन सादर करून प्रस्तावित कामाबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच सर्व सदर प्रकल्पा संबंधित सर्व कागदपत्रे, तसेच पालिका मंडळाचे ठराव सार्वजनिक करण्याची आणि प्रकल्प राबवण्यापूर्वी मडगावकराना विश्वासात घेण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

