
काँग्रेस नेते डॉ. केतन भाटीकर यांचा सर्पदंशाने मृत्यू
गोव्यातील काँग्रेस नेते डॉ. केतन भाटीकर (Ketan Bhatikar) यांचे निधन झाले आहे. सर्पदंशाने त्यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. गोव्याच्या राजकारणातील एक आश्वासक चेहरा म्हणून केतन भाटीकर यांच्याकडे पाहिले जात होते. तसेच अलीकडील फोंडा पोटनिवडणुकीसाठी केतन भाटीकर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. केतन भाटीकर हे प्रवास करत असताना अनमोड घाटात एका ठिकाणी थांबले होते. याच दरम्यान त्यांना विषारी सापाने दंश केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पहाटे ३:३२ च्या सुमारास त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून धारबांदोडा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
डॉ. भाटीकर यांच्या पायावर जखमेच्या खुणा
डॉ. भाटीकर यांच्या पायावर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे सर्पदंशाचा संशय बळावला आहे. मात्र, आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण केवळ शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोग्य प्रशासनाने कुळे पोलीस स्थानकाला पाचारण केले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
फोंडा पंचक्रोशीत शोककळा
डॉ. केतन भाटीकर यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. फोंडा पोटनिवडणुकीत भाजपाकडून तिकीट मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु, रवि नाईक यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याच मुलाला तिकीट देण्याचे भाजपाने निश्चित केले. या निवडणुकीत केतन भाटीकर यांचे पारडे जड मानले जात होते. ही निवडणूक झाली असती, तर भाजापाला मोठे आव्हान ठरले असते, असे सांगितले जात आहे. केतन भाटीकर हे फोंडा भागात अत्यंत लोकप्रिय होते. सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असायचा. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच फोंडा आणि धारबांदोडा परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक्सवर पोस्ट करत केतन भाटीकर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. प्रख्यात फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून अत्यंत मोठा धक्का बसला असून, अतिशय व्यथित झालो आहे. त्यांचे जाणे ही वैद्यकीय क्षेत्राची एक मोठी आणि कधीही भरून न येणारी हानी आहे. या अत्यंत कठीण प्रसंगी, त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि मित्रपरिवाराप्रती मी माझ्या मनापासूनच्या संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, असे प्रमोद सावंत यांनी शोक संदेशात म्हटले आहे. तसेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल यांनीही डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.

