गोदरेज फाऊंडेशनचा ‘टुमॉरो मेकर्स’ उपक्रम
वंचित विद्यार्थ्यांतील प्रतिभेला राष्ट्रीय व्यासपीठ
मुंबई : गोदरेज फाऊंडेशनने वंचित पार्श्वभूमीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शिक्षण, मार्गदर्शन आणि विविध क्षेत्रांतील संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘टुमॉरो मेकर्स’ या राष्ट्रीय उपक्रमाची घोषणा केली आहे. इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी तसेच पदवीधर युवक-युवती यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
भारतामध्ये प्रतिभावान विद्यार्थ्यांची संख्या मोठी असली तरी अनेकांना आवश्यक मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध होत नाहीत. ही दरी कमी करण्याच्या उद्देशाने ‘टुमॉरो मेकर्स’ व्यासपीठाची निर्मिती करण्यात आल्याचे फाऊंडेशनने सांगितले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संस्था, शिक्षक, मार्गदर्शक, स्पर्धा आणि समान आवडीच्या समुदायांशी जोडले जाणार आहे.
आठ भागीदार संस्थांच्या सहकार्याने STEM, नवोपक्रम व निर्मिती (Invention and Making), कला आणि संरक्षण अशा चार क्षेत्रांमध्ये कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘दक्षना’ आणि ‘अवंती फेलोज’ या संस्थांच्या माध्यमातून JEE आणि NEET परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाईल.
इयत्ता सहावी आणि सातवीतील विद्यार्थ्यांसाठी ‘Genwise’ आणि ‘MakerGhat’ यांच्या सहकार्याने रोबोटिक्स, संगणकशास्त्र आणि उच्च गणित विषयांवरील कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘Slam Out Loud’ या संस्थेच्या सहकार्याने संगीत, नाटक, लेखन आणि सर्जनशील अभिव्यक्ती यांसंदर्भात प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाईल. पदवीधर युवकांसाठी ‘Drama School Mumbai’मार्फत नाट्यकला प्रशिक्षण, तर ‘Delta Squad Foundation’ आणि ‘Yuvatejas’ यांच्या माध्यमातून संरक्षण सेवा परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे.
गोदरेज फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमर मोमीन यांनी सांगितले की, विविध सामाजिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना योग्य संधी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमांची फी परवडत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी गरजेनुसार शिष्यवृत्तीचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.


