गोवा

गिरीश चोडणकर पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी

​गोवा काँग्रेसच्या नेतृत्वात मोठे फेरबदल

पणजी​ : आगामी ​विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीसाठी काँग्रेस पक्षाने गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या (जीपीसीसी) नेतृत्वात मोठे फेरबदल केले आहेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीने (एआयसीसी) शुक्रवारी ​अमित पाटकर यांना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करत, ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकर यांची पुन्हा गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. ​ एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रकाद्वारे या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली असून त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.

गिरीश चोडणकर यापूर्वीही गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे तामिळनाडू आणि पुदुच्चेरी प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पुनर्नियुक्तीकडे आगामी ​विधानसभा निवडणुकीसाठी अनुभवी नेतृत्वाला पुन्हा पुढे आणण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

गोवा काँग्रेसच्या नव्या ​कार्यकारिणीत जेष्ठ नेते एम. के. शेख, अल्टोन डी’कोस्टा आणि अॅड. कार्लोस आल्वारेस फेरेरा यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दत्ता ​नायक यांच्याकडे पक्षाच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

​दरम्यान, काँग्रेस नेतृत्वाने माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Congress Brings Back Girish Chodankar to Lead Goa Unit

​यावेळी संघटनात्मक फेररचनेचा भाग म्हणून पक्षाने विविध महत्त्वाच्या समित्यांच्या नियुक्त्याही जाहीर केल्या आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून राज्यातील पक्षाच्या प्रचार आणि निवडणूक रणनीतीची जबाबदारी त्यांच्यावर असेल.​ दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्याकडे जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. पक्षाची धोरणात्मक भूमिका आणि निवडणूक आश्वासने निश्चित करण्याची जबाबदारी या समितीकडे असेल.

​तर, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री फ्रान्सिस्को सार्दिन्हा यांची समन्वय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून जीपीसीसीचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर हे समितीचे सहअध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.​ 

नव्या संघटनात्मक रचनेत पक्षातील ज्येष्ठ नेतृत्व, लोकप्रतिनिधी आणि संघटनात्मक पदाधिकारी यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पक्षाच्या विविध स्तरांमधील समन्वय अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.​ राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करण्याबरोबरच आगामी निवडणुकांच्या तयारीला वेग देण्यासाठी काँग्रेसने ही फेररचना केल्याचे मानले जात आहे. संघटनात्मक एकजूट वाढविणे, तळागाळातील पक्षकार्य अधिक बळकट करणे आणि भाजपविरोधात प्रभावी राजकीय पर्याय उभा करणे, हा या बदलामागील प्रमुख उद्देश असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!