
योग दिनासाठी सक्तीच्या उपस्थितीवर काँग्रेसचा आक्षेप
पणजी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांना रविवारी होत असलेल्या आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे निर्देश देणाऱ्या शिक्षण संचालनालयाच्या परिपत्रकावर गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आक्षेप घेतला आहे. हे परिपत्रक तात्काळ मागे घेऊन योग दिनातील सहभाग ऐच्छिक करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
योग ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असलेली प्राचीन पद्धत असून तिचा जगभर गौरव केला जातो. मात्र, त्यातील सहभाग हा वैयक्तिक निवडीचा विषय असावा, तो सरकारकडून सक्तीचा करण्यात येऊ नये, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.
रविवार हा अनेक कुटुंबांसाठी एकत्र वेळ घालवण्याचा दिवस असतो. तसेच गोव्यातील विविध समुदायांसाठी तो प्रार्थना, उपासना आणि धार्मिक कार्यक्रमांचा दिवस असल्याचे नमूद करत, पालकांना आपल्या मुलांनी सुट्टीचा दिवस कसा घालवावा हे ठरवण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.
साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी विद्यार्थी आणि शिक्षकांना शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास भाग पाडणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करताना चोडणकर यांनी सरकारवर वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचा आदर करण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक तातडीने मागे घ्यावे आणि योग दिन कार्यक्रमातील सहभाग पूर्णपणे स्वेच्छेने ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली.







