महाराष्ट्र

ओमराजे ‘वेट अँड वॉच’मध्ये; मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील राजकीय घडामोडींना वेग आला असून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी पुढील दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले असून, शिंदे गटात प्रवेशाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.


दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मुंबईतील ‘मातोश्री’वर जाऊन पक्ष नेतृत्वाशी चर्चा केली. फुटलेल्या किंवा बंडखोरीच्या चर्चेत असलेल्या खासदारांच्या मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असून पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा होणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.


ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात जाण्याच्या चर्चांमुळे केंद्रस्थानी आले आहेत. मात्र त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसून मतदारसंघातील कार्यकर्ते आणि समर्थकांशी चर्चा केल्यानंतर भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.


याच पार्श्वभूमीवर कैलास पाटील यांनी पक्षाशी निष्ठा कायम असल्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनांनुसार पुढील वाटचाल केली जाईल, असे संकेत दिले आहेत.


दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य निर्णयामुळे ठाकरे गटातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!