
आगामी निवडणुकीत ३० जागा जिंकू : भाजप
पणजी : केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी शनिवारी पणजी येथे झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
२०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ४० मतदारसंघांमध्ये पक्ष संघटना अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे मुरुगन यांनी सांगितले. तळागाळातील जनसंपर्क वाढवून भाजपला पुन्हा एकदा भक्कम जनादेश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असेही ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी भाजप सर्व ४० विधानसभा जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील सुमारे ३० मतदारसंघांमध्ये पक्षाची स्थिती मजबूत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उर्वरित काही मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बळकटीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
युतीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे असून योग्य वेळी त्याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे नाईक यांनी नमूद केले.
बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे तसेच पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती परिसरात पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बूथस्तरापर्यंत पक्ष अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.







