गोवा

मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांसाठी कांग्रेसची हेल्पलाईन

पणजी: नागरिकांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तसेच मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर कथितरीत्या वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांना मदत करण्याच्या उद्देशाने गोवा प्रदेश काँग्रेस समितीने (GPCC) आज ७८७५८३३८३३ हा विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरू केला.


या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत कांग्रेस कार्याध्यक्ष ॲड. कार्लोस आल्वारेस फरेरा, प्रवक्ते ॲड. अमित पालेकर आणि सावियो कुतिन्हो उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, मतदार यादीतून नाव वगळले गेले असल्याची शंका असलेल्या किंवा प्रत्यक्षात नाव वगळलेल्या पात्र मतदारांना मार्गदर्शन व आवश्यक मदत या हेल्पलाईनद्वारे दिली जाणार आहे.


ॲड. कार्लोस आल्वारेस फरेरा यांनी आरोप केला की गोव्यातील विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेचा गैरवापर करून भाजपविरोधी मतदारांना लक्ष्य करण्यात आले. त्यांनी नावेली मतदारसंघातील भाजपच्या बूथ लेव्हल एजंट्स (BLA) यांनी तयार करून सादर केलेल्या मतदार वगळण्याच्या याद्या पत्रकार परिषदेत सादर केल्या. या याद्यांद्वारे मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे मतदार यादीतून हटविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.


“सावियो कुतिन्हो यांनी हा प्रकार उघड केल्यानंतर संबंधित बीएलएं पैकी एकाने तातडीने आपला अर्ज मागे घेतल्याचे पत्र सादर केले. यावरून हा प्रकार केवळ एखाद्या एकाच मतदारसंघापुरता मर्यादित नसून राज्यभरातील विविध मतदारसंघांमध्ये अशाच पद्धतीने काम झाले असल्याचे दिसून येते,” असे ॲड. कार्लोस यांनी सांगितले.


यावेळी त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काही मतदारांची नावे यादीत कायम ठेवण्याचे दिलेले आदेशही सादर केले. मात्र असे आदेश असतानाही संबंधित मतदारांना पुन्हा फॉर्म-६ भरून अर्ज करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही प्रक्रिया निवडणूक नियमांच्या विरोधात असल्याचे सांगत, अशा आदेशांची अंमलबजावणी न करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.


यावेळी बोलताना सावियो कुतिन्हो म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर मतदार यादीतील कथित गैरव्यवहारांबाबत सातत्याने व्यक्त होत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ४ नोव्हेंबर २०२५ पासून गोव्यातील एसआयआर प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.


“पहिल्याच दिवसापासून आम्हाला या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आणि हस्तक्षेप दिसून आले. आम्ही प्रत्येक गैरप्रकार उघडकीस आणला तेव्हा आम्हाला खोट्या एफआयआरसारख्या माध्यमांतून गप्प बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज प्रत्येक जागरूक गोमंतकीय नागरिकाला मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी,” असे प्रवक्ते कुतिन्हो यांनी सांगितले.


त्यांनी पुढे आरोप केला की भाजप पदाधिकाऱ्यांना भाजपविरोधी मतदारांची नावे वगळण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तसेच एसआयआर प्रक्रियेदरम्यान भाजप नेते के. अन्नामलाई यांच्या गोवा दौऱ्यांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत या प्रक्रियेत त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरणाची गरज असल्याचे म्हटले.


ॲड. अमित पालेकर यांनी सांताक्रूज मतदारसंघाचे उदाहरण देत सांगितले की, एसआयआर प्रक्रियेदरम्यान सुमारे २० टक्के मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. “एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार अचानक अस्तित्वात नसल्याचा दावा करणे अशक्य आहे. प्रत्यक्षात त्या परिसरात राहणाऱ्या आणि मतदानाचा पूर्ण अधिकार असलेल्या नागरिकांची नावे वगळण्यात आली, तर दुसरीकडे सरकारी निवासस्थानांमध्ये वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींची नावे अजूनही मतदार यादीत कायम आहेत. यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात,” असे पालेकर यांनी सांगितले.


काँग्रेस नेत्यांनी सर्व नागरिकांना तातडीने आपले नाव मतदार यादीत तपासण्याचे आणि कोणतीही अडचण असल्यास जीपीसीसीच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

“मतदानाच्या दिवशी आपला घटनात्मक मतदानाचा हक्क हिरावला गेला आहे, हे लक्षात येण्याची वाट पाहू नका. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकला गेला पाहिजे. गोव्यातील प्रत्येक नागरिकाच्या लोकशाही हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे,” असे नेत्यांनी स्पष्ट केले.

मतदार यादीतून नाव वगळण्यात आले असल्याची शंका असलेल्या किंवा त्याबाबत मदतीची आवश्यकता असलेल्या सर्व मतदारांनी ७८७५८३३८३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गोवा प्रदेश काँग्रेस समितीने केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!