पुण्यात एफ-१ सिम रेसिंग टाइम ट्रायल्सला प्रारंभ; ८८१ विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे : भारतात मोटरस्पोर्टमधील तळागाळातील प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेड (एमएफआरएल) आणि फॉर्म्युला-१ (F1®) यांच्या संयुक्त विद्यमाने शाळांमध्ये एफ-१ सिम रेसिंग इंडिया ओपन स्कूल टाइम ट्रायल्स उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची पहिली अंमलबजावणी पुण्यातील द बिशप्स स्कूलमध्ये झाली असून, अशी स्पर्धा आयोजित करणारी ही देशातील पहिली शाळा ठरली आहे.
२६ ते २९ जूनदरम्यान झालेल्या या स्पर्धेत एकूण ८८१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ५२८ कनिष्ठ आणि ३५३ वरिष्ठ गटातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. अंतिम टॉप-१०० क्रमवारीत ५२ कनिष्ठ आणि ४८ वरिष्ठ स्पर्धकांनी स्थान मिळविले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना व्यावसायिक फॉर्म्युला-१ सिम्युलेटरवर प्रशिक्षण देण्यात आले. मोटरस्पोर्टमधील रेस इंजिनिअरिंग, वाहन गतीशास्त्र (व्हेईकल डायनॅमिक्स), डेटा विश्लेषण, सिम्युलेशन इंजिनिअरिंग यांसारख्या क्षेत्रांतील करिअरच्या संधींचीही माहिती देण्यात आली. ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असल्याने पुण्याची या कार्यक्रमासाठी पहिली निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्पर्धेतील वरिष्ठ गटात रेयान बक्षी याने १ मिनिट २१.८११ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळविला. कनिष्ठ गटात अरमान खिनवासरा याने १ मिनिट २३.३४७ सेकंद वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावले. कनिष्ठ गटातील ४० विद्यार्थ्यांनी १ मिनिट ३० सेकंदांपेक्षा कमी वेळ नोंदवत प्रमाणपत्रासाठी आवश्यक निकष पूर्ण केले. वरिष्ठ गटातील पहिल्या तीन स्पर्धकांमध्ये अवघा ०.०५६ सेकंद, तर कनिष्ठ गटातील पहिल्या तिघांमध्ये ०.०९८ सेकंद इतकाच फरक होता. या स्पर्धेतील अव्वल विद्यार्थी आता अधिकृत एफ-१ सिम रेसिंग इंडिया ओपनच्या विभागीय फेऱ्यांमध्ये सहभागी होणार आहेत.
मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमित गाढोके यांनी सांगितले की, भारतात मोटरस्पोर्टसाठी शाश्वत परिसंस्था उभारण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मोटरस्पोर्ट हे केवळ रेसिंग चालकांपुरते मर्यादित नसून अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच या क्षेत्राची ओळख व्हावी, हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
द बिशप्स स्कूलचा विद्यार्थी आणि उदयोन्मुख रेसिंग चालक सिद्धार्थ भानुशाली याने, शालेय स्तरावर मोटरस्पोर्टला दिले जाणारे प्रोत्साहन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शाळेत वापरण्यात येणारे सिम्युलेटर आणि फॉर्म्युला-१ शैलीतील स्टीयरिंग व्हील्समुळे विद्यार्थ्यांना वास्तवदर्शी रेसिंगचा अनुभव मिळत असल्याचे त्याने नमूद केले.
एफ-१ सिम रेसिंग इंडिया ओपन कार्यक्रमांतर्गत द बिशप्स स्कूल ही भारतातील पहिली फ्लॅगशिप पार्टनर स्कूल ठरली आहे. पुढील टप्प्यात हा उपक्रम विश्वशांती गुरुकुल वर्ल्ड स्कूल (आयबी), पुणे येथे १ ते ५ जुलैदरम्यान आयोजित करण्यात येणार असून, देशातील नव्या सिम रेसिंग प्रतिभांचा शोध घेण्यावर भर दिला जाणार आहे.





