
कांपाल क्रीडा संकुलाच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध
प्रस्ताव मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
पणजी : कांपाल येथील नव्याने विकसित करण्यात आलेले फुटबॉल मैदान व क्रीडा संकुल खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावित निर्णयाला गोवा प्रदेश काँग्रेस समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे. हा प्रस्ताव तातडीने मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने बुधवारी दिला.
जीपीसीसीचे माध्यम व संवाद विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोवा राज्य नागरी विकास संस्था (जीएसयूडीए) कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी पक्षाचे प्रवक्ते ॲड. अमित पालेकर, युवा काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतीक्षा खलप, सेवा दलाचे प्रमुख राजन घाटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. पालेकर यांनी राज्य सरकारवर सार्वजनिक मालमत्ता खासगी हितसंबंधांसाठी उपलब्ध करून देत असल्याचा आरोप केला. सुमारे ४० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर जवळपास ३० कोटी रुपयांच्या सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेले कांपाल क्रीडा संकुल हे गोव्यातील युवक आणि खेळाडूंसाठी असून त्याचे व्यापारीकरण होऊ नये, असे त्यांनी सांगितले.
कांपाल क्रीडा संकुलासंदर्भातील प्रस्तावाबाबत क्रीडा खाते, जीएसयूडीए, पणजी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासन स्पष्ट भूमिका घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सार्वजनिक क्रीडा सुविधा व्यापारी कार्यक्रमांसाठी वापरण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची टीका करत डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमचाही त्यांनी उल्लेख केला.
अमरनाथ पणजीकर यांनी सार्वजनिक निधीतून उभारलेली मालमत्ता खासगी संस्थांच्या ताब्यात देणे योग्य नसल्याचे सांगत, प्रस्ताव मागे घेतला नाही तर काँग्रेस आंदोलन अधिक तीव्र करेल, असा इशारा दिला.
युवा काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांनी राज्य सरकारवर सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. कांपाल क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन गोवा क्रीडा प्राधिकरणाकडे (एसएजी) सोपवावे आणि पणजी तसेच परिसरातील नागरिकांसाठी सुविधा पूर्ववत उपलब्ध ठेवाव्यात, अशी मागणी माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी केली.
सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेली क्रीडा पायाभूत सुविधा कोणत्याही परिस्थितीत खासगीकरणासाठी देऊ नये, अशी भूमिका काँग्रेसने मांडत कांपाल क्रीडा संकुलाच्या प्रस्तावित खासगीकरणाला विरोध कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.





