गोवा

महिलांच्या वेदनेची भाषा जगभरात एकच​ : ज्योती कुंकळकर

​मडगाव, प्रतिनिधी :

देश-विदेशातील विविध भाषांतील महिला साहित्यिकांचे लेखन वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जगभरातील महिलांच्या वेदना, संघर्ष आणि अनुभवांची भाषा सारखीच आहे. समाज, संस्कृती किंवा देश वेगळा असला तरी स्त्रीच्या आयुष्यातील वेदना आणि संवेदना समान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका, अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका ज्योती कुंकळकर यांनी केले.

गोव्यातील फेडरेशन ऑफ ऑल गोवा मल्याळी असोसिएशन्सतर्फे आयोजित १३ व्या प्रवासी मल्याळी साहित्य संगम कार्यक्रमात त्या विशेष अतिथी म्हणून बोलत होत्या. मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला ​साहित्य अकादमी विजेते ज्येष्ठ साहित्यिक पॉल झकारिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर लेखक कण्कूर आर. सुरेश कुमार हेही विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले होते. विविध राज्यांतील तसेच परदेशात वास्तव्यास असलेल्या मल्याळी साहित्यिकांनी या साहित्य संमेलनात सहभाग घेतला.

यावेळी बोलताना कुंकळकर म्हणाल्या की, देशातील आणि परदेशातील विविध भाषांमध्ये सातत्याने लेखन करणाऱ्या महिलांचे साहित्य वाचल्यानंतर जगभरातील महिलांच्या वेदना आणि संघर्षाचे स्वरूप सारखेच असल्याचे स्पष्टपणे जाणवते. स्त्रीच्या आयुष्यातील सामाजिक बंधने, असमानता आणि भावनिक अनुभव यांना भाषा किंवा सीमांचे बंधन नसते, असे त्यांनी नमूद केले.

The language of women's pain is the same across the world: Jyoti Kunkalkar

त्याचवेळी त्यांनी महिलांच्या सर्जनशीलतेविषयी चिंता व्यक्त केली. अनेक महिलांकडे उत्तम कलागुण, लेखनक्षमता किंवा साहित्यिक प्रतिभा असूनही त्या स्वतःच्या कलेला दुय्यम स्थान देतात. घर, संसार, नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःच्या लेखनासाठी किंवा कलेसाठी आवश्यक वेळ आणि प्राधान्य देण्यात त्या मागे पडतात, असे त्यांनी सांगितले.​ महिलांनी आपल्या सर्जनशील क्षमतेवर विश्वास ठेवून कलेला आणि साहित्यनिर्मितीला प्राधान्य दिले पाहिजे. समाजात स्त्रियांचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी त्यांचे लेखन सातत्याने पुढे येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पॉल झकारिया यांनी साहित्याच्या माध्यमातून सामाजिक वास्तव आणि मानवी मूल्यांचे जतन करण्याची गरज व्यक्त केली, तर कण्कूर आर. सुरेश कुमार यांनी प्रवासी मल्याळी साहित्याची परंपरा आणि विविध भाषांमधील साहित्यिक संवादाचे महत्त्व स्पष्ट केले.

गोव्यातील मल्याळी समाजातील साहित्यिक, लेखक, रसिक आणि विविध सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी या साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध साहित्यिक विषयांवरील चर्चासत्रे, संवाद आणि अनुभवकथनांमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!