
झेंड्यांवरील कारवाईवरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
पणजी: काँग्रेसचे झेंडे हटवून जनतेच्या मनातून काँग्रेसला दूर करता येईल, असा भाजपचा समज असेल तर तो भ्रम असल्याची टीका गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या माध्यम व जनसंपर्क विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली.
पणजीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसचे झेंडे हटवण्याची कारवाई केली असून, हा प्रकार सत्ताधारी पक्षाच्या राजकीय असुरक्षिततेचे आणि हतबलतेचे द्योतक आहे. “आमचा प्रत्येक झेंडा काढला जाईल, तेव्हा आम्ही त्याऐवजी शेकडो नवे झेंडे उभारू,” असा इशाराही त्यांनी दिला.
पणजी शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा कॅसिनो जाहिरातींचे फलक आणि होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस भाजप सरकार आणि पणजी महानगरपालिका (सीसीपी) दाखवत नसल्याचा आरोप त्यांनी केला. “बेकायदा होर्डिंग्ज हटवण्याऐवजी काँग्रेसचे झेंडे हटवले जात आहेत. यावरून सरकारची दुटप्पी भूमिका आणि प्राधान्यक्रम स्पष्ट होतात,” असे ते म्हणाले.
काँग्रेसचे झेंडे हटवण्याचा प्रकार हा सत्ताधारी पक्षाला शोभणारा नसून स्वस्त, क्षुद्र आणि भ्याड राजकारणाचे उदाहरण असल्याची टीकाही त्यांनी केली.
“विरोधी पक्षाच्या झेंड्यांची भीती वाटणाऱ्या सरकारने काँग्रेसचे झेंडे काढण्याऐवजी बेकायदा होर्डिंग्ज, भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी आणि जनविरोधी कारभार दूर करण्यावर भर द्यावा,” असे पणजीकर यांनी म्हटले.
भाजप काँग्रेसचे झेंडे काढू शकतो; मात्र जनतेच्या मनातील काँग्रेस कधीही हटवू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.




