गोवा

प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचे आरोग्य विमा संरक्षण द्या : आप

पणजी :
गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला कोणत्याही अटींशिवाय १० लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून चर्चेसाठी वेळ मागितला आहे.


वाल्मिकी नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दर्जेदार आरोग्यसेवा हा प्रत्येक गोमंतकीयाचा अधिकार असून, पंजाबमधील आप सरकारने राबविलेल्या १० लाख रुपयांच्या आरोग्य विमा योजनेचा अनुभव गोवा सरकारला आवश्यक असल्यास सामायिक करण्यास पक्ष तयार आहे.


गोव्यातील दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना (डीडीएसएसवाय) आणि पंजाबमधील आरोग्य विमा योजनेची तुलना करताना त्यांनी डीडीएसएसवायमध्ये केवळ ४४७ उपचारांचा समावेश असून पंजाबमध्ये २,३५० उपचारांना विमा संरक्षण मिळत असल्याचा दावा केला. उपचारांची मर्यादित व्याप्ती आणि रुग्णालयांना देयके मिळण्यात होणारा विलंब यामुळे अनेक खासगी रुग्णालये ही योजना स्वीकारण्यास टाळाटाळ करतात, असा आरोपही त्यांनी केला.


सक्रिय डीडीएसएसवाय कार्डधारकांची संख्या २.९५ लाखांवरून १.८१ लाखांपर्यंत घटल्याचा दावा करत या योजनेवरील लोकांचा विश्वास कमी होत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. राज्यातील सुमारे ९० टक्के नागरिक सरकारी आरोग्य सेवांवर अवलंबून असले तरी सरकारी रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि आवश्यक वैद्यकीय सेवांची कमतरता असल्याचा आरोप त्यांनी केला.


भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (सीएजी) यांच्या अहवालातही राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेकडे लक्ष वेधण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प ३० हजार कोटी रुपयांहून अधिक असताना आरोग्य योजनांसाठी केवळ १०० कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचाही दावा त्यांनी केला.


राज्य सरकारने आरोग्य विमा संरक्षणाची मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढवावी, उपचारांच्या यादीचा विस्तार करावा आणि रुग्णालयांना वेळेवर देयके अदा करावीत, अशी मागणी नाईक यांनी केली. तसेच प्रत्येक गोमंतकीयाला परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!