
अमीत शहा, देवेंद्र फडणवीस ७ सप्टेंबरला गोव्यात
णजी :
गोवा, गुजरात, महाराष्ट्र तसेच दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या पश्चिम विभाग मंडळाची (वेस्टर्न झोनल कौन्सिल) २८ वी बैठक येत्या ७ सप्टेंबर रोजी गोव्यात होणार आहे. या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
या बैठकीच्या तयारीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी पत्रव्यवहार केला असून, बैठकीसाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना गोवा सरकारला देण्यात आल्या आहेत.
तसेच, पश्चिम विभाग मंडळातील सदस्य आणि सल्लागारांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यास सांगण्यात आले आहे. बैठकीसाठी सुरक्षा व्यवस्था, निवास, वाहतूक आणि अन्य प्रशासकीय बाबींची तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही राज्य प्रशासनाला देण्यात आले आहेत.
पश्चिम विभाग मंडळाच्या बैठकीत सहभागी राज्यांमधील परस्पर समन्वय, सीमाविषयक प्रश्न, पायाभूत सुविधा, अंतर्गत सुरक्षा, सहकार, वाहतूक आणि विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. गोव्यात होणाऱ्या या बैठकीमुळे राज्याला राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या प्रशासकीय चर्चेचे यजमानपद मिळणार आहे.






