
प्रभव नायक यांची मुख्यमंत्र्यांकडे मठग्राम विद्या संकुल प्रकल्पाला गती देण्याची मागणी
मडगाव : मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून दवर्ली येथील मठग्राम विद्या संकुल प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली आहे. हा प्रकल्प मडगाव व दक्षिण गोव्यासाठी परिवर्तनकारी ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रभव नायक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात, १२ ऑगस्ट २०२४ रोजी मडगांवचो आवाजतर्फे दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मडगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख शैक्षणिक संस्था टप्प्याटप्प्याने दवर्ली येथील प्रस्तावित शैक्षणिक संकुलात स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सरकारकडे या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला होता याची नोंद सदर पत्रात आहे.
तसेच, २८ जुलै २०२५ रोजी गोवा विधानसभेत फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी हा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांकडून तीन महिन्यांच्या आत प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन घेतल्याची आठवणही प्रभव नायक यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे.
प्रभव नायक यांनी नमूद केले की, ६ मार्च २०२६ रोजी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दवर्ली येथील मठग्राम विद्या संकुलाच्या कामाला सुरुवात झाल्याची घोषणा केली होती. आता हा प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सरकारने तातडीने अंमलबजावणीला गती द्यावी, अशी मागणी मडगांवचो आवाजने केली आहे.
मठग्राम विद्या संकुलामुळे मडगाव शहरावरील ताण कमी होईल, शैक्षणिक संस्थांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी होईल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आधुनिक सुविधा असलेली शैक्षणिक परिसंस्था उभी राहील, असे प्रभव नायक यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
सार्वजनिक हिताच्या प्रश्नांबाबत आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करताना प्रभव नायक म्हणाले की, मडगांवचो आवाज प्रत्येक महत्त्वाच्या लोकहिताच्या प्रश्नाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून तो तर्कसंगत निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे.






