गोवा

मडगाव पोलीस स्थानक व पोलीस निवासी वसाहतीची करा नव्याने उभारणी : प्रभव नायक

मडगाव – मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मडगाव पोलीस स्थानक तसेच लगतच्या पोलीस निवासी वसाहतीची तातडीने नव्याने उभारणी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. पोलीस स्थानकात आढळलेल्या डेंग्यूच्या रुग्णांनी सरकारसाठी धोक्याची घंटा वाजवली असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


प्रभव नायक यांनी सांगितले की, दक्षिण गोवा जिल्हा पोलीस मुख्यालयात मडगाव पोलीस स्थानक कार्यरत असून हे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या पोलीस आस्थापनांपैकी एक आहे. मात्र, सध्याची जीर्ण झालेली इमारत आधुनिक पोलीस व्यवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम नाही.


लगतची पोलीस निवासी वसाहतही अत्यंत जीर्णावस्थेत असून परिसरात जप्त व बेवारस वाहने, कचऱ्याचे ढीग आणि वाढलेली झाडी दिसून येते. इमारतींच्या भिंतींवर झाडे उगवली असून अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे हा परिसर डासांच्या उत्पत्तीला पोषक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.



पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरणात राहण्याचा व काम करण्याचा अधिकार आहे. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस दलाला अशा दुर्लक्षित आणि असुरक्षित पायाभूत सुविधांमध्ये काम करावे लागणे दुर्दैवी असल्याचे प्रभव नायक म्हणाले.


संपूर्ण पोलीस संकुलाचा सर्वंकष पुनर्विकास करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यामध्ये आधुनिक पोलीस स्थानक, अद्ययावत जिल्हा पोलीस मुख्यालय, सुसज्ज निवासी वसाहत, पोलीस वाहनांसह नागरिकांच्या वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था, उत्तम स्वच्छता, जलनिस्सारण व्यवस्था आणि इतर नागरी सुविधा उभारण्यात याव्यात. तसेच जप्त व बेवारस वाहने तातडीने हटवून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.



प्रस्तावित पोलीस संकुल भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उभारण्यात यावे. त्यामध्ये आधुनिक कार्यालयीन सुविधा, अत्याधुनिक पोलीस उपकरणे, डिजिटल सुविधा, प्रशिक्षण व परिषद कक्ष, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी व्यायाम व मनोरंजन क्षेत्र, सुशोभिकृत मोकळी जागा आणि इतर आवश्यक सुविधा असाव्यात. गोवा पोलीस दलाच्या व्यावसायिक कार्याला साजेशा दर्जाचे आधुनिक पायाभूत संकुल उभारणे ही काळाची गरज असल्याचे प्रभव नायक यांनी नमूद केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!