
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार २, ३ सप्टेंबरला गोवा दौऱ्यावर
पणजी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार २ आणि ३ सप्टेंबर रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते निवडणूक तयारीचा आढावा घेण्याबरोबरच अधिकारी आणि बूथ पातळीवरील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
फातोर्डा-मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये त्यांच्या बैठका आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कला अकादमी उपलब्ध नसल्याने रवींद्र भवनची निवड करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत प्रसारमाध्यम आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाचे महासंचालकही उपस्थित राहणार आहेत.
बूथ अधिकाऱ्यांशी बैठक
२ सप्टेंबर रोजी ज्ञानेश कुमार बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ३ सप्टेंबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. विधानसभा निवडणूक असलेल्या राज्यांना भेटी देऊन मुख्य निवडणूक आयुक्तांकडून तयारी आणि निवडणूक परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन
या दौऱ्यात महाविद्यालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या मतदार साक्षरता क्लबमधील विद्यार्थ्यांशीही मुख्य निवडणूक आयुक्त संवाद साधणार आहेत. प्रथमच मतदानाचा हक्क मिळालेल्या किंवा लवकरच मतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची प्रक्रिया, अर्ज कसा भरावा आणि मतदान करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत ते मार्गदर्शन करतील.







