देश/जग

भाजप उमेदवाराला मिळाले अवघे एक मत; स्वतःचे मतही देता आले नाही!

राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनोखा निकाल; काँग्रेसच्या उमेदवाराचा ३७६ मतांनी विजय

जयपूर :राजस्थानमधीलस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालात एक अनोखा प्रकार समोर आला आहे. डीडवाना-कुचामन जिल्ह्यातील परबतसर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपच्या कैलाशचंद यांना अवघे एक मत मिळाले. विशेष म्हणजे, ज्या प्रभागातून ते निवडणूक लढले, त्या प्रभागाचे ते मतदारच नसल्याने त्यांना स्वतःलाही मतदान करता आले नाही.

या प्रभागातून काँग्रेसच्या हिना खानम विजयी झाल्या. त्यांना ३७६ मते मिळाली. अपक्ष उमेदवार रशीद खान यांना १९५ मते मिळाली. त्यानंतर भाजपचे कैलाशचंद यांना केवळ एक मत मिळाले.

‘माझे मत प्रभाग क्रमांक १२मध्ये’

एकच मत मिळाल्यानंतर कैलाशचंद यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते प्रभाग क्रमांक १२चे मतदार असून, भाजपने त्यांना शेजारील प्रभाग क्रमांक १३मधून उमेदवारी दिल्याचे त्यांनी सांगितले.

“मला एक मत मिळाले. माझे मत प्रभाग क्रमांक १२मध्ये आहे. मला प्रभाग क्रमांक १३मधून उमेदवारी देण्यात आली. त्या प्रभागातील कोणीतरी मला मतदान केले आहे,” असे कैलाशचंद यांनी पीटीआयला सांगितले.

परबतसरमध्ये काँग्रेसला बहुमत

कैलाशचंद यांच्या निकालाची चर्चा होत असतानाच परबतसर नगरपालिकेच्या एकूण निकालात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. २५ प्रभागांपैकी काँग्रेसने १३ जागा जिंकत बहुमत मिळवले, तर भाजपला १२ जागांवर समाधान मानावे लागले.

राजस्थानमधील ३०९ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये १० हजारांहून अधिक नगरसेवकांच्या जागांसाठी मतदान झाले होते. या व्यापक निवडणूक प्रक्रियेदरम्यान कैलाशचंद यांना मिळालेले एकमेव मत विशेष चर्चेचा विषय ठरले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!