
‘गोंधळ’ ऑस्करची अधिकृत निवड चुकीची?; अनुरागच्या वक्तव्यावर दिग्दर्शक संतोष डावखर यांची प्रतिक्रिया
मुंबई : भारताकडून ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर) ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ विभागात अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेल्या मराठी ‘गोंधळ’ चित्रपटावरून आता चर्चा सुरू झाली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी भारताच्या ऑस्कर निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करताना, देशाकडून अनेकदा चुकीच्या चित्रपटांची निवड केली जाते, असे मत व्यक्त केले. त्यावर ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनुराग कश्यप यांनी ‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत भारताच्या ऑस्करमधील कामगिरीबाबत भाष्य केले. “आपण चुकीचे चित्रपट निवडतो,” असे त्यांनी म्हटले. ‘द लंचबॉक्स’ आणि ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ यांसारख्या चित्रपटांची निवड झाली असती, तर परिस्थिती वेगळी असती, असेही त्यांनी नमूद केले. निवड प्रक्रियेत राजकारणाचा प्रभाव असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र, ‘गोंधळ’ हा चित्रपट आपण अद्याप पाहिलेला नसल्याचे कश्यप यांनी स्पष्ट केले.
कश्यप यांच्या या वक्तव्यानंतर ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. कश्यप यांच्याबद्दल आदर व्यक्त करत त्यांनी आपण यापूर्वी त्यांना ‘गोंधळ’बद्दल माहिती दिल्याचे सांगितले.
“२६ एप्रिल रोजी बंगळुरू-मुंबई विमानप्रवासादरम्यान मी त्यांना ‘गोंधळ’ची ओळख करून दिली होती. त्यांनी हा चित्रपट पाहिलेला नसल्याचे सांगितले होते आणि तो नक्की पाहू, असेही म्हटले होते,” असे डावखर यांनी सांगितले. त्यानंतर मात्र हा चित्रपट मुंबईत सार्वजनिकरीत्या प्रदर्शित किंवा दाखवला गेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.
‘चित्रपट पाहण्यापूर्वी मत बनवू नका’
“प्रेक्षकांनी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी ‘गोंधळ’ पाहावा,” अशी विनंती डावखर यांनी केली. चित्रपटाचे आगामी पुनःप्रदर्शन चित्रपटगृहांमध्ये होणार असून, त्यावेळी प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘गोंधळ’ हा मराठी मानसशास्त्रीय थरारपट असून त्याचे लेखन आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक ‘गोंधळ’ लोककलेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा उलगडते. इशिता देशमुख, योगेश सोहोनी, किशोर कदम, सुरेश विश्वकर्मा आणि निषाद भोईर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
डावखर यांना यापूर्वी ‘गोंधळ’साठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शनाचा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार मिळाला आहे. भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवड झाल्यानंतर या चित्रपटाकडे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष लागले आहे.







