देश/जग

काँग्रेसमधील घराणेशाहीच्या आरोपांवर सोनिया गांधींचं उत्तर; म्हणाल्या, “हा प्रश्न पक्षालाच विचारा”

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षावर सातत्याने होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपांवर ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्ष गांधी कुटुंबाच्या नेतृत्वापलीकडे का जाऊ शकत नाही, असा प्रश्न त्यांना ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर, “हा प्रश्न तुम्ही पक्षालाच विचारला पाहिजे. आम्ही सर्वजण निवडणुका लढवतो, जिंकतो आणि हरतोही,” असं उत्तर सोनिया गांधी यांनी दिलं.

सोनिया गांधी यांचं ‘Belonging: A Journey of Love’ हे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्यांनी ‘द गार्डियन’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसमधील नेतृत्व, गांधी कुटुंबावरील घराणेशाहीचे आरोप, आणीबाणी आणि कुटुंबातील काही महत्त्वाच्या राजकीय घटनांबाबत भाष्य केलं.

काँग्रेस पक्षावर भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने घराणेशाहीचा आरोप केला जातो. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या राजकीय भूमिकांवरूनही भाजप नेते काँग्रेसवर टीका करतात. गांधी कुटुंबाच्या नेतृत्वातून काँग्रेस बाहेर का पडू शकत नाही, असा प्रश्न सोनिया गांधी यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देण्याऐवजी हा प्रश्न पक्षालाच विचारण्याची सूचना केली. निवडणुकीच्या राजकारणात पक्षातील सर्वजण सहभागी होतात आणि त्यात विजय-पराजय दोन्हींचा सामना करावा लागतो, असंही त्यांनी सांगितलं.

‘आणीबाणी लागू करणं ही चूक होती’

या मुलाखतीत सोनिया गांधी यांनी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीबाबतही महत्त्वाचं भाष्य केलं. आणीबाणी लागू करण्याचा निर्णय चुकीचा होता आणि इंदिरा गांधी यांनाही कालांतराने या निर्णयाबाबत अस्वस्थता वाटू लागली होती, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

आणीबाणीच्या काळात कुटुंबातही या निर्णयावरून मतभेद होते. सोनिया गांधी यांच्या मते, त्यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, संजय गांधी यांनी विरोधकांविरोधात कठोर भूमिका घेण्याचा आग्रह धरला होता. संजय गांधी यांच्यावर वेळीच नियंत्रण ठेवता आलं असतं, तर आणीबाणीनंतर उद्भवलेली परिस्थिती आणि त्यातून झालेलं नुकसान टाळता आलं असतं, असंही त्यांनी आत्मचरित्रात नमूद केलं आहे.

आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी मनातून अस्वस्थ होत्या, असंही सोनिया गांधी यांनी सांगितलं. त्यांच्या मते, आणीबाणीचा निर्णय इंदिरा गांधी यांच्या मनावरही परिणाम करणारा ठरला होता.

या मुलाखतीत सोनिया गांधी यांनी गांधी कुटुंबातील राजकीय घडामोडींबरोबरच देशाच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाच्या घटनांकडेही मागे वळून पाहिलं आहे. त्यांच्या आगामी आत्मचरित्रातून या घटनांबाबत अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!