
काझीरंगाजवळ ट्रॅव्हलर-ट्रकची भीषण धडक; २६ जणांचा मृत्यू
मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश; २० जण जखमी, राष्ट्रीय महामार्गावर अपघात
गुवाहाटी : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ शुक्रवारी ट्रॅव्हलर आणि कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले. मृतांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. गोलाघाट जिल्ह्यातील रोंगाजान परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७१५ वर हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली मिनी बस बोकाखाटहून नागावच्या दिशेने जात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकशी तिची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की ट्रॅव्हलरचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. अनेक प्रवासी वाहनात अडकले होते. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केले.
गोलाघाटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वप्ननील डेका यांनी अपघातातील मृतांची संख्या वाढत असल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी मदतकार्य राबवले. जखमींना सुरुवातीला कोहोरा मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी बोकाखाट, गोलाघाट आणि जोरहाट मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलविण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅव्हलरचा वेग निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक होता. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान परिसरात वाहनांच्या वेगावर निर्बंध असतानाही वाहन वेगाने जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. जखमींना तातडीने सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, याला सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे मंत्री अतुल बोरा घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्यावर देखरेख करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.






