
आयएसपीएलचा चौथा हंगाम गोव्यात; ६ डिसेंबरपासून क्रिकेटचा थरार
वेर्णा येथील १९१९ स्पोर्ट्झ स्टेडियमवर ३ जानेवारी २०२७ पर्यंत सामने
पणजी : इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या (ISPL) चौथ्या हंगामाचे आयोजन गोव्यात करण्यात येणार असून, या स्पर्धेला गोवा सरकारने पाठिंबा जाहीर केला आहे. टेनिस-बॉल क्रिकेटच्या टी-१० स्वरूपातील ही स्पर्धा ६ डिसेंबर २०२६ ते ३ जानेवारी २०२७ या कालावधीत वेर्णा येथील १९१९ स्पोर्ट्झ क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबईत झालेल्या चौथ्या हंगामाच्या खेळाडू लिलावादरम्यान ही घोषणा करण्यात आली.
गोव्यामध्ये क्रीडा पर्यटनाला चालना देण्याबरोबरच स्थानिक तरुणांना क्रिकेटच्या राष्ट्रीय व्यासपीठावर संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने या स्पर्धेकडे पाहिले जात आहे. स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक समुदायांचा सहभाग वाढवणे आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना संधी उपलब्ध करून देणे, हा आयोजकांचा उद्देश आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्यात समृद्ध क्रीडा संस्कृती विकसित करणे आणि विविध स्तरांवरील गुणवंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. तळागाळातील क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी देण्याच्या ISPL च्या प्रयत्नांशी राज्य सरकारची भूमिका सुसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले.
समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही खेळांमुळे तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास आणि विविध सामाजिक स्तरांतील खेळाडूंना संधी मिळण्यास मदत होते, असे सांगितले. ISPL च्या माध्यमातून क्रिकेट अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सचिन तेंडुलकर यांचाही सहभाग
ISPL कोअर कमिटीचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी गल्लीबोळातील क्रिकेटमधून अनेक गुणवंत खेळाडू पुढे येत असल्याचे सांगितले. अशा खेळाडूंना व्यावसायिक स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, ही ISPL मागील प्रमुख संकल्पना असल्याचे त्यांनी नमूद केले. चौथा हंगाम गोव्यात आयोजित करणे हा लीगच्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा असल्याचेही त्यांनी म्हटले.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि ISPL कोअर कमिटीचे सदस्य आशिष शेलार यांनी गेल्या तीन हंगामांत लीगने क्रिकेट चाहत्यांशी जोडलेले नाते आणि स्थानिक खेळाडूंसाठी निर्माण केलेल्या संधींचा उल्लेख केला. गोवा सरकारचा पाठिंबा मिळाल्यामुळे स्पर्धेचा राष्ट्रीय स्तरावरील विस्तार अधिक मजबूत होईल, असे त्यांनी सांगितले.
लीगचे आयुक्त आणि कोअर कमिटीचे सदस्य सूरज सामत यांनी गोव्यातील क्रिकेटप्रेमींना एक वेगळा क्रीडा अनुभव देण्याबरोबरच स्थानिक खेळाडू आणि समुदायांना या स्पर्धेशी जोडण्याचा आयोजकांचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
‘स्ट्रीट टू स्टेडियम’ संकल्पनेवर भर
२०२४ मध्ये सुरू झालेल्या ISPL मध्ये टेनिस-बॉल क्रिकेटला व्यावसायिक स्टेडियमचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. गल्लीबोळांत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना मोठ्या स्तरावर संधी मिळावी, हा या लीगचा मुख्य उद्देश आहे. इरफान उमैर आणि विवेक शेलार यांसारख्या खेळाडूंनी या लीगमधून पुढे येत देशांतर्गत क्रिकेटमध्ये राज्य संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
मुंबई आणि सुरत येथे झालेल्या मागील हंगामांना क्रिकेट चाहत्यांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर चौथा हंगाम गोव्यात आयोजित केला जात आहे. या लीगला सलमान खान, अमिताभ बच्चन, अजय देवगण, हृतिक रोशन, सैफ अली खान, करीना कपूर खान, सूर्या आणि राम चरण यांसारख्या चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे फ्रँचायझी मालक म्हणून पाठबळ लाभले आहे.
गोव्यातील स्पर्धेमुळे राज्याच्या क्रीडा पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक खेळाडू, क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आणि पर्यटन उद्योगाला कोणत्या संधी उपलब्ध होतात, याकडे लक्ष लागले आहे.






