IFFI 2026 : ‘फादरलँड’ने उलगडली युद्धाने विभागलेल्या जर्मनीची कथा
ऑस्करविजेते दिग्दर्शक पावेल पावलिकोव्स्की यांच्या चित्रपटाचा भारतात पहिलाच प्रीमियर
पणजी : दुसऱ्या महायुद्धाच्या जखमा, शीतयुद्धाची चाहूल आणि राजकीय विचारसरणीमुळे विभागलेल्या जर्मनीची पार्श्वभूमी असलेल्या ‘फादरलँड’ (Ojczyzna) या चित्रपटाने ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) सुरुवात झाली. ऑस्करविजेते पोलिश दिग्दर्शक पावेल पावलिकोव्स्की यांच्या या चित्रपटाचा भारतातील पहिला प्रीमियर २० नोव्हेंबर रोजी गोव्यात झाला. आयनॉक्समधील सर्व स्क्रीनवर चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१९४९ च्या उन्हाळ्यातील जर्मनीची पार्श्वभूमी असलेला हा कृष्णधवल चित्रपट नोबेल पुरस्कार विजेते जर्मन लेखक थॉमस मान आणि त्यांची मुलगी एरिका यांच्या प्रवासाभोवती फिरतो. अमेरिकेत १६ वर्षे निर्वासित जीवन व्यतीत केल्यानंतर हे पिता-पुत्री जर्मनीत परततात. दुसऱ्या महायुद्धाच्या विध्वंसातून सावरणाऱ्या देशात त्यांचा प्रवास सुरू होतो. अमेरिकेच्या नियंत्रणाखालील फ्रँकफर्टपासून सोव्हिएत नियंत्रणाखालील वायमारपर्यंतचा हा प्रवास केवळ भौगोलिक नसून बदललेल्या मातृभूमीशी पुन्हा नाते जोडण्याचा प्रयत्न आहे.
युद्धामुळे विभागलेला देश, परस्परविरोधी राजकीय विचारसरणी आणि कुटुंबातील गुंतागुंतीची नाती यांची सांगड चित्रपटात घालण्यात आली आहे. ओळख, आपलेपणा, स्मृती आणि सलोखा अशा विषयांना चित्रपटाने स्पर्श केला आहे.
‘सीमांच्या पलीकडच्या कथा’ या संकल्पनेशी नाते
चित्रपटाच्या निर्मात्या इव्हा पुश्चिन्स्का यांनी ‘फादरलँड’ची निर्मिती प्रक्रिया इफ्फीच्या ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ या संकल्पनेशी जोडली. जर्मन लेखक आणि जर्मन जनतेची कथा जर्मन भाषेत सांगणारा हा चित्रपट प्रत्यक्षात पोलिश कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सहभागातून साकारला आहे. त्यामुळे कथा आणि तिच्या निर्मितीला भौगोलिक सीमा अडथळा ठरत नाहीत, असे त्यांनी सांगितले.
नवी दिल्लीतील पोलंडच्या दूतावासाचे प्रमुख पिओत्र आंतोनी श्विताल्स्की यांनी भारत-पोलंड संबंधांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित केले. दोन्ही देशांमधील मैत्रीचा सर्वांत मजबूत पाया संस्कृती असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) अध्यक्ष जी. कृष्णकुमार आणि इफ्फीचे कलात्मक संचालक पंकज सक्सेना उपस्थित होते.
चार देशांची संयुक्त निर्मिती
‘फादरलँड’मध्ये सँड्रा ह्युलर आणि हान्स झिश्लर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ८२ मिनिटांच्या या चित्रपटाची पोलंड, जर्मनी, इटली आणि फ्रान्स या चार देशांनी संयुक्त निर्मिती केली आहे. यंदाच्या कान, सॅन सेबॅस्टियन आणि टेल्युराइड या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटाचे प्रदर्शन झाले आहे. कान चित्रपट महोत्सवात पावलिकोव्स्की यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.




