तीस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
नवी दिल्ली :
गुजरात दंगलीनंतर सरकारविरोधात कट रचल्याच्या आरोपांखाली सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून त्या अटकेत आहे. त्यात आता सर्वोच्च न्यायालयाने तीस्ता सेटलवाड यांना मोठा दिलासा दिला आहे. तीस्ता सेटलवाड यांना अंतरित जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.
दरम्यान, गुरुवारी तीस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. तेव्हा जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी सहा आठवडे पुढे का ढकलली? सामान्य स्वरूपाचा गुन्हा असलेल्या अशा प्रकरणांत एका महिला आरोपीविरोधात सुनावणीला एवढा विलंब का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. तसेच, तीस्ता सेटलवाड यांच्याविरोधात पोटा अथवा यूएपीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला नाही. मग दोन महिन्यांपासून त्यांना कोठडीत का ठेवले, असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला विचारला होता.