ऐतिहासिक सप्तकोटेश्वर मंदिरात गळती…
छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिरात आता गळती सुरू झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी थेट मंदिरात गळत आहे. या मंदिराचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर काही महिन्यातच गळती समोर आल्याने नुतणीकरणाच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुरातत्व खात्यातर्फे सुमारे सात कोटी रुपये खर्च करुन पाच महिन्यांपुर्वी या मंदिराचे नुतनीकरण केले गेले होते. 11 फेब्रूवारी रोजी मंदिराचे लोकार्पण केले गेले होते. आता मंदिराच्या गर्भकुडीवरील घुमटीतून पावसाचे पाणी ठिबकत आहे. लाद्या बसवूनही जमिनीखालून पाणी झिरपत आहे.
दरम्यान, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज (बुधवारी) मंदिराच्या कामाची पाहणी केली. फळदेसाई यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, कंत्राटदार यांना धारेवर धरले.
पुरातत्व खात्याने मंदिराचे नूतनीकरण केले असले, तरी कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची होती. याप्रकरणाची चौकशी करुन आवश्यक ती कारवाई करू, असे मंत्री फळदेसाई म्हणाले.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त करत सखोल चौकशी करुन, कायमस्वरूपी उपाययोजना करावी. अशी मागणी मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे केली.