या’ तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्रातलं नोबेल…
यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेचे शास्त्रज्ञ पियरे अगोस्तिनी, जर्मनीचे फेरेन्स क्रॉज आणि स्वीडनच्या अॅनी एल. हुईलर यांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. या तीन शास्त्रज्ञांनी अशी उपकरणं विकसित केली आहेत, ज्याद्वारे अॅटोसेकंदात इलेक्ट्रॉनचं जग पाहता येईल. अॅटोसेकंद म्हणजे १/१,000,000,000,000,000 वा भाग. याद्वारे त्यांनी ब्रम्हांडाचं वय शोधून काढलं. ब्रह्मांडाचं वय जाणून घेण्यापासून ते आरोग्य तपासण्यांपर्यंत अनेक गोष्टींसाठी अगोस्तिनी, क्रॉज आणि हुईलर यांचं संशोधन कामी आलं आहे.
अॅनी एल. हुईलर यांनी १९८७ मध्ये एक निरीक्षण नोंदवलं की, जेव्हा नोबल गॅसमधून इन्फ्रारेड लेजर लाईट टाकली जाते, तेव्हा प्रकाशाचे अनेक ओव्हरटोन दिसतात. प्रत्येक ओव्हरटोनची वेगळी सायकल आहे. जेव्हा एखाद्या वायूच्या अणूंवर प्रकाश पडतो तेव्हा असं घडतं. त्यामुळे अणूंच्या इलेक्ट्रॉन्सना ऊर्जा मिळते. त्यामुळे ते अणू प्रकाशित होतात.
तर पियरे अगोस्तिनी यांनी २००१ मध्ये प्रकाशाशी संबंधित एक प्रयोग केला. या प्रयोगाद्वारे त्यांना इलेक्ट्रॉन्सचं जग समजून घेता आलं. इलेक्ट्रॉन्सवर अशा प्रकारचा प्रयोग याआधी कोणीच केला नव्हता. हा प्रयोग करताना त्यांनी अॅनी एल. हुईलर यांच्या प्रयोगांचाही आधार घेतला.
इलेक्ट्रॉन्सचं जग समजून घेणं, त्यांच्या हालचाली पाहणं, त्यांची चमक आणि ऊर्जा समजून घेणं अवघड काम आहे. आपण जसजसं यावर संशोधन करत जाऊ तसतशी भविष्यात अत्याधुनिक इलेक्ट्रॉन उत्पादनं विकसित करता येतील. इलेक्ट्रॉन नियंत्रित कसे करायचे, अॅटोसेकंद तंत्रज्ञानाच्या मदतीने रेणू ओळखणं हे खूप मोठं संशोधन आहे. वैद्यकीय निदान करण्यात याची मदत होणार आहे.