‘मडगावची आग हा म्हणजे टिकींग बॉम्बचा आणखी एक धोक्याचा इशारा…’
मडगाव :
मडगावमधील न्यू मार्केट येथे आजची आगीची घटना ही गोव्यातील विविध ठिकाणी पसरलेल्या टिकिंग बॉम्बचा आणखी एक इशारा आहे. सरकार आणि नागरिकांनी पुढच्या धोक्याची जाणीव करून सुधारात्मक पावले उचलण्याची वेळ आली आहे. अग्निशमन दलासाठी रस्त्यातील अडथळे, अग्निशमन दलाकडील साधनांचा अभाव हे आज पुन्हा एकदा समोर आले, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
मी सतत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांच्या एकंदरीत तयारीचा मुद्दा उपस्थित करत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभाग पाण्याचे टँकर म्हणून कालबाह्य वाहने वापरत आहे. सरकारकडील अनेक वाहने 20 वर्षांहून अधिक जुनी आहेत. अशा वाहनांपैकी एक वाहन जवळपास 25 वर्षे जुने आहे आणि तरीही ते एका ठिकाणी कार्यरत आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
मी नागरिकांना नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आवश्यक ती सुधारात्मक पावले उचलावीत. मडगाव येथील बाजार परिसरात अस्ताव्यस्त पार्किंग, रस्त्यांवर मधोमध इंटरनेट आणि टेलिव्हिजन केबल्स, उघडे वीज जोडणी जंक्शन बॉक्स तसेच कापडाच्या दुकानांलगतच्या दुकानांमध्ये फटाक्यांची साठवणूक यामुळे आग लागण्याचा मोठा धोका आहे, असे युरी आलेमाव यांनी निदर्शनास आणले आहे.