‘राज्यातील दोन्ही जागा विक्रमी मताधिक्याने जिंकणार’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गोव्यात दहा वर्षांत सर्वच क्षेत्रात विकास साधला आहे, त्याच्याच बळावर गोव्यातील भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. उत्तरेतील उमेदवार एक लाखांपेक्षा जास्त, तर दक्षिणेतील उमेदवार ६० हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी स्नेहा गीते (आयएएस) यांच्याकडे उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी १८ आमदार आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सावंत म्हणाले, श्रीपाद भाऊंचा अर्ज भरण्यासाठी भाजपचे सर्व आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती समाजातील बांधव मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. ‘सबका साथ सबका विकास” या पंतप्रधानांनी सांगितलेल्या मार्गावर भाजप सरकार काम करीत आहे. विकसित भारत-विकसित गोवा करण्यासाठी यावेळी श्रीपाद भाऊंना निवडून आणावे, असे आवाहन मतदारांना त्यांनी केले.
अर्ज सादरीकरणाच्याप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, उपसभापती ज्योशुआ डिसोझा, आमदार जेनिफर मोन्सेरात, डॉ. दिव्या राणे, डिलायला लोबो, केदार नाईक, रुडाल्फ फर्नांडिस, मायकल लोबो, जित आरोलकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रवीण आर्लेकर, प्रमेंद्र शेट यांच्यासह माजी आमदार ग्लेन टिकलो, दयानंद मांद्रेकर यांच्यासह. कोअर कमिटीचे सदस्य, पदाधिकारी, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष, सदस्य, विविध पंचायतींचे सरपंच व सदस्य उपस्थित होते.
या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी गर्दी झाली आहे, हेच लोक भाजपला विजयी करण्यासाठी झटत आहेत. १९९१ व १९९९ मध्ये भाजपच्या जशा पद्धतीने भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आले होते, त्याच पद्धतीने २०२४ मध्येही दोन्ही उमेदवार निवडून येतील. केंद्र व राज्य अशा डबल इंजिन सरकारने अपेक्षित असा विकास साध्य केलेला आहे. विकसित भारत करण्याचे काम सुरू झालेले आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरिता आपणास निवडून द्यावे, असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले.