ये तो होना ही था! इंधन दरवाढ मागे घ्या – युरी आलेमाव
पणजी :
ये तो होना ही था! लोकसभा निवडणूक संपली आणि असंवेदनशील भाजप सरकारने इंधनावरील व्हॅट वाढवला. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1 रुपये आणि डिझेलच्या दरात 36 पैशांनी वाढ झाली आहे. भाडेवाढ त्वरित मागे घ्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इव्हेंट आयोजनावर होणारा वासफळ खर्च थांबवून काटकसरीचे उपाय अवलंबावेत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
सरकारला सर्वसामान्यांचा कणा मोडायचा आहे. अलीकडे त्यांनी वीज दरवाढ केली; आज इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. वीज दरवाढीमुळे जनतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया भाजप सरकारचा गरीब विरोधी अजेंडा उघड करते, असे युरी आलेमाव म्हणाले.
सर्वात भ्रष्ट भाजप सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचे मला आश्चर्य वाटत नाही. कार्यक्रमांवर करोडो रुपये खर्च करून माया कमावण्यावर भाजपवाल्यांचा भर असतो. राज्याची तिजोरी रिकामी झाल्याने निधी गोळा करण्यासाठी आणि अधिक इव्हेंट आयोजित करण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. भाजप सरकारला सर्वसामान्यांच्या त्रासाची पर्वा नाही, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी गोमंतकीयांना व्हॅटमध्ये कपात करून पेट्रोलचे दर प्रति लिटर 60 च्या खाली ठेवण्याचे आश्वासन दिले होते. दुर्दैवाने पर्रिकरांचे “राजकीय वारसदार” म्हणणऱ्या डॉ. प्रमोद सावंत यांनी व्हॅट वाढवून नेमके उलटे केले आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
शासनाने ही दरवाढ मागे न घेतल्यास आम्ही आंदोलन करू. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सुबुद्धी येईल आणि गोमंतकीयांना रस्त्यावर येण्यास ते भाग पाडणार नाहीत अशी आशा मी बाळगतो, असे युरी आलेमाव म्हणाले.