पणजी :
गेल्या काही वर्षांमध्ये ‘एव्हीजीसी एक्स-आर’ क्षेत्राला मिळालेली उर्जितावस्था लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नुकतीच देशाची ‘एव्हीजीसी एक्स आर’ पॉलिसी तयार केली आहे. याच धर्तीवर गोवा राज्याची स्वतःची अशी ‘एव्हीजीसी एक्स आर’ पॉलिसी असली पाहिजे, हे प्रामुख्याने ठरवत, गोवा राज्याच्या एव्हीजीसी एक्स-आर संघटनेच्यावतीने एक विशेष कमिटी स्थापन करून, गोव्याच्या कलात्मक आणि व्यावसायिक भवितव्यासाठी ठोस विचार असलेली ‘गोवा एव्हीजीसी एक्स आर’ पॉलिसी तयार करण्यात येईल. आणि त्यानंतर सदर पॉलिसी राज्य सरकारला सादर करण्यात येईल. जेणेकरून सरकारला त्यानुरूप राज्यामध्ये एव्हीजीसी एक्स आर उद्योगासाठीची ध्येयधोरणे आखणे सोपे होऊन जाईल, असे प्रतिपादन गोवा एव्हीजीसी एक्स-आर संघटनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध सिनेकर्मी तपन आचार्य यांनी केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ‘गोवा एव्हीजीसी एक्स आर’ संघटनेच्या पहिल्या सर्वसाधारण बैठकीनंतर ते बोलत होते.
यावेळी ‘गोवा एव्हीजीसी एक्स आर’ संघटनेच्या संस्थापक कार्यकारी मंडळाने आपला पदभार स्वीकारला. यात अध्यक्ष तपन आचार्य यांच्यासह उपाध्यक्ष किशोर अर्जुन, सचिव रोहित खांडेकर, खजिनदार जितेंद्र शिकेरकर, सहसचिव विनय भट, कार्यकारिणी सदस्य विनीत कुंडईकर, प्रद्युमन्य नाईक, योगीराज भांगले आदींची उपस्थिती होती.
गोव्यात ‘एव्हीजीसी एक्स-आर’ म्हणजेच अनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, कॉमिक्स , एक्सटेंडेड रिऍलिटी उद्योगांना बळकटी मिळावी आणि या क्षेत्रात गोव्यातील कलाकारांना अधिकाधिक प्राधान्य मिळावे यासाठी प्रामुख्याने एव्हीजीसी एक्स आर संघटना सक्रिय काम करणार असून, यावेळी संघटनेच्या भविष्यातील कामकाजाचे आरेखन करण्यात आले.
ॲनिमेशन आणि गेमिंग सारख्या युवा आकर्षक कलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याचप्रमाणे या क्षेत्रात जगभरात होत असलेले महत्वाचे प्रयोग गोव्यातील अबालवृद्धांपर्यत पोहोचवण्यासाठी देशाच्या सिनेमहोत्सव राजधानीत म्हणजेच गोव्यामध्ये ॲनिमेशन सिनेमहोत्सव आयोजित करणे हि काळाची गरज आहे. त्यामुळे लवकरच राज्यामध्ये ॲनिमेशन सिनेमहोत्सवाचे आयोजन करण्याचे संघटना नियोजन करत आहे.
– तपन आचार्य,
अध्यक्ष, गोवा एव्हीजीसी एक्स आर संघटना.
…
‘राज्यात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ येण्यासाठी प्रयत्नशील’
केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच ‘एव्हीजीसी एक्स आर’च्या राष्ट्रीय ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ला मंजुरी दिली आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमीवर सदर ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना गोव्यात व्हावी यासाठी संघटना सर्वतोपरी सक्रिय प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष तपन आचार्य यांनी बैठकीत नमूद केले. नजीकच्या भविष्यात ‘एव्हीजीसी एक्स आर’ उद्योगामध्ये निर्माण होणाऱ्या उद्योगाच्या संधी आणि त्याचा विस्तार याचा आताच दूरगामित्वाने विचार करता आणि गोव्याचे देश विदेशातील सिनेसृष्टीमधे असलेले आकर्षण पाहता सदर ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या माध्यमातून गोव्यात मोठ्याप्रमाणात कलात्मक उद्योगाच्या संधी तयार होऊन गोवा हे देशातील ‘एव्हीजीसी एक्स आर’ क्षेत्रातील प्रमुख केंद्र म्हणून समोर येऊ शकेल, असा विश्वास यावेळी सदस्यांकडून व्यक्त करण्यात आला.