
बाणवलीत ‘आप’च्या वतीने ई-लायब्ररीचे उद्घाटन; सुमारे ४,५०० विद्यार्थ्यांना होणार लाभ
बाणवली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या आतिशी तसेच आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्या उपस्थितीत बाणवली येथे ई-लायब्ररी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साधने आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
उद्घाटनापूर्वी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते पाच ज्येष्ठ नागरिकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मंजुरीपत्रे देण्यात आली.
यावेळी बोलताना केजरीवाल यांनी सांगितले की, आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सुरू केलेला हा उपक्रम मतदारसंघातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. बाणवलीतील सर्व शाळा या योजनेत सहभागी झाल्यानंतर सुमारे ४,५०० विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. वाढत्या महागाईमुळे महागडी पाठ्यपुस्तके आणि ‘नीट’, ‘जेईई’सारख्या स्पर्धा परीक्षांच्या कोचिंगची फी अनेक कुटुंबांना परवडत नाही. अशा परिस्थितीत ई-लायब्ररीमुळे विद्यार्थ्यांना हजारो पुस्तके, संदर्भ साहित्य आणि डिजिटल अभ्याससामग्री मोफत उपलब्ध होऊन पालकांचा आर्थिक भार कमी होईल, असे त्यांनी नमूद केले.
लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास जनतेला थेट लाभ मिळू शकतो, असे सांगत त्यांनी आमदार व्हिएगस यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविल्याचे कौतुक केले. शिक्षण आणि आरोग्य ही सरकारची मूलभूत जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी आपल्या भाषणात प्रशासनाची खरी कसोटी मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यात असल्याचे सांगितले. आम आदमी पक्षाच्या आमदारांनी सत्तेअभावीही नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मदत केल्याचे त्यांनी नमूद केले. सक्षम सार्वजनिक शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था उभी करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, २०२२ पासून बाणवलीमध्ये शिक्षणकेंद्रित मॉडेल टप्प्याटप्प्याने विकसित केले जात आहे. ई-लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी, एनसीआरटी अभ्यासक्रम, ‘नीट’ आणि ‘जेईई’ तयारीचे कोर्स तसेच डिजिटल शैक्षणिक साधने घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे त्यांनी सांगितले.




