पेडणे:
आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2022 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कथित सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणप्रकरणी पेडणे पोलिसांनी बजावलेले समन्स बुधवारी मागे घेतले आहे.
गोव्याच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करत असताना सार्वजानिक मालमत्तांचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी केजरीवाल यांना पेडणे पोलिसांनी 13 एप्रिल रोजी सीआरपीसी कलम 41 (A) अंतर्गत नोटीस बजावली होती आणि 27 एप्रिल रोजी तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु केजरीवाल यांनी पेडणे पोलिसांनी जारी केलेल्या समन्सला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि वाल्मिकी मिनेझिस यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची बुधवारी सुनावणी झाली. यावेळी पोलिसांनी केजरीवाल यांना बजावलेले समन्स मागे घेणार असल्याचे सांगितले.
आपचे गोवा अध्यक्ष ॲड. अमित पालेकर म्हणाले की, भाजप ‘आप’ला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळेच ‘आप’ला संपवण्याचा डाव भाजप नेते रचत असतात. खेदाची बाब म्हणजे भाजपमुळे न्यायालयांना क्षुल्लक राजकारण हाताळावे लागत आहे.