‘मी स्वतःच माझ्या अपयशांची यशोगाथा आहे’
55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चौथ्या दिवशी, आज पणजी येथील कला अकादमीमध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर यांच्या मार्गदर्शनाखाली रंगलेल्या मास्टरक्लास मध्ये विद्यार्थी आणि प्रतिनिधी मंत्रमुग्ध झाले.
खेर यांनी ‘पॉवर ऑफ फेल्युअर’ या विषयाने सत्राला सुरुवात केली. ते म्हणाले, “मला वाटते की मी स्वतःच माझ्या अपयशांची यशोगाथा आहे.” संपूर्ण सत्र म्हणजे, जीवनात त्यांना मिळालेल्या धड्यांचा एक मास्टरक्लास होते, आपल्या खुमासदार शैलीत त्यांनी सादर केलेल्या वैयक्तिक जीवनातील असंख्य कथांनी भरलेले.
अनुपम खेर म्हणाले की, त्यांची कथा शिमल्यामध्ये सुरु झाली, जिथे चौदा जणांचे त्यांचे कुटुंब एका खोलीत राहत होते, आणि त्यांचे वडील घरातील एकमेव कमावती व्यक्ती, होते. एका अर्थाने ते गरीब होते, पण त्यांचे आजोबा म्हणायचे की, जेव्हा एखादी व्यक्ती खूप गरीब असते, तेव्हा तिच्यासाठी आनंद सर्वात स्वस्त असतो.
या कसलेल्या अभिनेत्याने, आपण इयत्ता पाचवीत असताना शाळेच्या नाटकात पहिल्यांदा काम केल्याची आठवण सांगितली. त्यावेळी आपल्याला उत्तेजनार्थ पारितोषिकही मिळाले नाही, याचे दुःख झाले होते, असे ते म्हणाले. “माझ्या वडिलांनी मला त्या दिवशी शिकवले की, अपयश ही एक घटना असते, व्यक्ती नाही.” त्यांनी सांगितले. आपल्या पुढल्या प्रयत्नात, या नवोदित अभिनेत्याने विल्यम शेक्सपियरच्या ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकात त्याला दिलेल्या संवादाच्या 2 ओळींमध्ये 27 चुका केल्या! बघता बघता ते दिवस सरले, आणि एक दिवस नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मधून सुवर्णपदक मिळवून हा तरुण अभिनेता पहिल्यांदाच मुंबईत आला. खेर म्हणाले, “एनएसडी चा सुवर्णपदक विजेता असल्यामुळे, पहिल्याच प्रयत्नांत आपण ही मायानगरी जिंकू, असा मला आत्मविश्वास होता. मात्र काही महिन्यांतच या अभिनेत्याला वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकावर 27 दिवस राहावे लागले.”
अनेक चढ-उतारांनंतर खेर यांना ‘सारांश’ चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले. खेर यांनी, 1984 मध्ये या चित्रपटासाठी दिल्ली मधील इफ्फी महोत्सवात त्यांनी भेट दिली होती ती आठवण सांगितली. यंदा या मास्टरक्लासबरोबर, इफ्फी मधील आपल्या पहिल्या भेटीला 40 वर्षे पूर्ण झाली, असे ते म्हणाले.
अनुपम खेर यांच्यासाठी आयुष्य म्हणजे चढ-उतारांची रोलरकोस्टर राईड ठरली. प्रत्येक पडझड, मग ती ‘हम आपके है कौन’ च्या शूटिंगदरम्यान झालेला चेहऱ्याचा अर्धांगवायू असो, की 2004 मधील दिवाळखोरी असो, दर वेळी त्यांनी आपले वडील आणि आजोबांनी दिलेल्या शिकवणीचे पालन केले.
अनुपम खेर यांचा चढ-उतारांचा जीवन प्रवास ऐकताना श्रोते शब्दशः हरवून गेले. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने, सुस्पष्ट विचारांनी आणि अभिनयाने, या अडुसष्ट (68) वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याने आपल्या जीवन तत्वज्ञानाच्या टॉनिकने समस्त प्रेक्षक वर्गाला भारावून सोडले. ते म्हणजे, ‘NEVER GIVE UP’!