भाजपचे ‘चलो बूथ अभियान’; काँग्रेसने मागवले इच्छुक उमेदवारांचे अर्ज…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सर्वच पक्षांनी कसून तयारी सुरु केली आहे. सर्व राजकीय पक्ष विविध राज्यात चाचपणी करत आहेत.
त्यातही भाजप आणि काँग्रेस यांच्या जरा जास्तच चढाओढ दिसत असून गोव्यात आज सोमवारी भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष सूद आज गोव्यात दाखल झाले आहेत.
गोव्यात आल्यावर त्यांनी 6 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मडगावात होणाऱ्या सभेच्या आणि रॅलीच्या तयारीचा आढावा घेतला.
तसेच सायंकाळी त्यांनी पणजीतील पक्ष कार्यालयात लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेंसह मुख्यमंत्री डॉ.सावंत आणि भाजप कोअर कमिटीसोबत बैठकही घेतली.
आशिष सूद यांच्या सोबत झालेल्या बैठकी नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजप लवकरच ‘बूथ चलो अभियान’ सुरु करणार असल्याची माहिती दिलीय. 2024 च्या निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळण्यासाठी सर्वच जण कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तर दुसरीकडे काँग्रेस मधील नेतेंमंडळींनी आपल्यापरीने जनतेच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जे इच्छुक उमेदवार असतील त्यांच्यासाठी कॉंग्रेसने अर्ज मागवले आहेत.
या अर्जासमवेत बायोडेटाही देणे आवश्यक असून 5 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा समिती कार्यालयांमध्ये अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असल्याचे काँग्रेसने आपल्या पत्रकातून सांगितले आहे.