google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘आरोग्य खात्याच्या हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्टमध्ये 118 कोटी रुपयांचा घोटाळा’

आरोग्य सेवा संचालनालयाच्या हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्टच्या निविदेत भाजपच्या कार्यकर्त्याने भरलेल्या किंमतीपेक्षा दुप्पट बोली लावलेल्या आस्थापनाला कंत्राट देवून आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी ७५ टक्के कमिशनसाठी 118 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरिश चोडणकर यांनी केला आहे.


भाजपने जे नेते काँग्रेसमधून आयात केले आहेत तेच आता या पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांना काम मिळण्यापासून वंचित ठेवत आहे हे या प्रकरणावरून सिद्ध झाल्याचे ते म्हणाले. 


चोडणकर यांनी नुकतीच  काँग्रेस हाऊस मध्ये पत्रकार परिषद घेऊन आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि भाजप सरकारचा पर्दाफाश केला. त्यांच्या मते राणे यांनी कमिशनसाठी भाजप कार्यकर्त्याला डावलून  इको क्लीन सिस्टीम अँड सोल्युशनला हा कंत्राट दिला आहे.


यावेळी विरेंद्र शिरोडकर, फ्लोरियानो मिरांडा, अनवर सय्यद हे काँग्रेसचे नेते उपस्थित होते.


‘‘इको क्लीन सिस्टीम अँड सोल्युशनने 104.8 कोटी रुपयांची निविदा सादर केली आहे, तर भाजपचे कार्यकर्ता प्रदीप शेट यांनी त्यांच्या महालसा सर्व्हिसेसच्या माध्यमातून केवळ 47.03 कोटी रुपयांची निविदा सादर केली आहे. मात्र शेट यांना डावलून ईको क्लीन या आस्थापनाला ही कंत्राट देण्यात आला आहे,’’असे चोडणकर म्हणाले. 


पात्रता निकष सुद्धा इको क्लीन सिस्टीम अँड सोल्युशनने ठरवले होते, अधिकाऱ्यांनी नाही, असा आरोपही त्यांनी केला.


“सरकारने या सेवेच्या खर्चाचा अंदाज लावला नव्हता, ती बोली लावणाऱ्याद्वारे करावी लागली. यावरून हे स्पष्ट आहे की हे निविदा  आरोग्यमंत्र्यांच्या जवळच्या कंपनीला देण्याचे निश्चित करण्यात आले होते,” असे ते म्हणाले.


“प्रदीप शेटची बोली 10 कोटींच्या कामाचा अनुभव नसल्याच्या शुल्लक कारणावरून जाणीवपूर्वक नाकारण्यात आली. त्याला निविदा प्रक्रियेपासून हेतुपुरस्सर दूर ठेवण्यासाठी त्याची आर्थिक बोलीही उघडण्यात आली नाही. कारण विश्वजित राणे यांना हा कंत्राट अशा आस्थापनाला द्यायचा होता जिथून त्यांना कमिशन मिळेल,’’ असे चोडणकर म्हणाले.


ते म्हणाले की, करार आणखी पाच वर्षांसाठी वाढविला जाणार असल्याने ही 118 कोटी रुपयांची लूट होईल.


“पाच वर्षांपासून राणेंच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या या आस्थापनाने 104.8 कोटी रुपयांची बोली लावली होती. तर शेट यांनी केवळ 47.03 कोटी रुपयांची बोली लावली होती. पाच वर्षांसाठी ५७ कोटी रुपयांचा फरक आहे, पुढील पाच वर्षांसाठी ५ टक्क्यांनी वाढ केल्यावर ही आंकडेवारी ६१ कोटी रुपयांची लूट होईल, म्हणजे ११८ कोटी रुपयांचा घोटाळा,’ असे चोडणकर म्हणाले.


“भाजपच्या वाढीसाठी काम करणारे आणी श्रीपाद नाईक यांच्या बरोबर पंच म्हणून निवडून आलेले प्रदीप शेट यांनी मागील २५ वर्षे पक्षासाठी योगदान दिले आहे. मात्र न्याय मिळवण्यासाठी त्यांना न्यायालयात  जावे लागले हे जाणून वाईट वाटते. किमान प्रदीप शेट यांनी भाजपच्या आयात केलेल्या नेत्याने अवलंबलेल्या अशा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याचे धैर्य दाखवले आणि उच्च न्यायालयाने त्यांच्या तांत्रिक बोलीवर पुनर्विचार करण्याचे आणि आर्थिक बोली उघडण्याचे निर्देश दिले हे उत्तम आहे,” असे चोडणकर म्हणाले.


“आम्ही फक्त ऐकले होते की एनजीओ, क्लव्ड आल्वारीस आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे इतर लोक न्यायालयात जातात. पण आता भाजपचे कार्यकर्तेही भ्रष्टाचाराला कंटाळले आहेत आणि त्याला आळा घालण्यासाठी कायदेशीर मदत घेण्यास सुरुवात केली आहे,” असे चोडणकर म्हणाले.

“मला मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे अध्यक्ष तानावडे यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे की हे ‘रामराज्य’ आहे की काय जिथे राज्यांच्या तिजोरीची लूट केली जाते,” असा प्रश्न चोडणकर यांनी केला.

‘’तुमचेच सरकार तुमच्याशी कसे वागत आहे, याचा विचार करण्याची भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांवर वेळ आली आहे. मी मुख्यमंत्री, भाजप अध्यक्ष आणि आरोग्यमंत्री राणे यांना आव्हान देतो की त्यांनी माझ्या आरोपांचा प्रतिकार करावा आणि मला चुकीचे सिद्ध करावे,” असे चोडणकर म्हणाले.


राज्यांचे दायित्व 36000 कोटी रुपये आहे आणि त्यात भाजपचा भ्रष्टाचार आणखी भर घालत आहे असेही ते म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!