
मडगावचे आमदार मडगावकरांना फसवत आहेत : प्रभव
मडगाव :
पक्षांतर करणारे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी कबूल केले आहे की मडगाव नगरपालीका मडगावकरांना सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. त्यांनी एक प्रकारे सर्व नगरसेवकांना धमकावले आहे. आता मंत्रिपद मिळण्याची शक्यता शून्य असल्याने, ते मडगावचे नगराध्यक्ष म्हणून राजकारणातून निवृत्त होण्याचे स्वप्न पाहत असतील. एप्रिल फूलचा दिवस निवडणे हे गोव्यातील लोकांना मूर्ख बनवण्याच्या त्यांच्या स्वभावाशी तंतोतंत जुळतो, असा टोला मडगावचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी हाणला आहे.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मडगाव नगरपालीका प्रशासनात सुशासन आणण्यासाठी १ एप्रिलपासून जोरदार मोहीम सुरू करणार असल्याच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, प्रभव नायक यांनी मडगावच्या आमदारांना शहराचा विकास करण्यात अपयशी ठरल्याबद्दल फटकारले.
मडगावमध्ये अनेक इमारती असुरक्षित घोषित करण्यात आल्या आहेत, पार्किंग सुविधांमध्ये गोंधळ आहे, पालिकेत कामे करुन घेताना नागरिकांना जनतेला त्रास सहन करावा लागतो. कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने संकलन आणि विल्हेवाट लावण्यात नगरपालीकेला आलेले अपयश आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वत्र मोठ्या प्रमाणात बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळे नागरीक हैराण आहेत. त्यांच्या वक्तव्याने एका अर्थाने दिगंबर कामत यांना मडगावमध्ये आपल्या पायाखालची वाळू सरकत असल्याची जाणीव झाली आहे, असा दावा प्रभव नायक यांनी केला.
स्वार्थासाठी वारंवार पक्षांतर करून, मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केवळ आपल्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची फसवणूक केली नाही तर साक्षात देवाचीही अवहेलना केली आहे. त्यांचे कृत्य अक्षम्य आहे आणि त्यांना त्यांच्या दुष्कृत्यांची परतफेड करावीच लागेल, असे प्रभव नायक म्हणाले.
नगरपालिका निवडणुका जवळजवळ एका वर्षावर आली असल्याने, दिगंबर कामत आता गाढ झोपेतून जागे झाले आहेत. जर मडगाव नगरपालिका योग्यरित्या काम करत नाही हे त्यांना मान्य असेल, तर त्यांनी सर्वात प्रथम ज्या नगराध्यक्षांसाठी त्यांनी नगरपालिका कायदा बदलला होता त्या नगराध्यक्षालाच पदावरुन पायऊतार करावे, अशी मागणी प्रभव नायक यांनी केली आहे.
मडगावचे नागरीक आमदार दिगंबर कामत आणि त्यांच्या पाठिंब्याने कार्यरत असलेल्या नगरपालीकेच्या गैरकारभाराबद्दल व चुकांविरुद्ध बोलत राहतील. त्यांनी सध्या राबविलेल्या घराणेशाही विरुद्धही मडगावकर त्यांना जाब विचारतील. मडगाव पालीकेने जाहिर केलेल्या रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रीयेचे काय झाले हे दिगंबर कामतांनी सांगावे अशी मागणीही प्रभव नायक यांनी केली आहे.