‘सरकारी अधिका-यांकडून मडगावच्या नागरीकांची सतावणूक होणे धक्कादायक’
मडगाव :
मडगावच्या सर्वसामान्य जनतेच्या छोटय़ा छोटय़ा कामांसाठीच्या अर्जांवर मॉडेल मडगाव पोर्टलवरून अर्ज न आल्यास गॉडमन दिगंबर कामत यांच्या आदेशावरून सरकारी अधिका-यांकडून मडगावच्या नागरीकांची सतावणूक होणे धक्कादायक आहे. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आणि मडगाव नगरपालीकेचे मुख्याधिकारी यांनी त्वरित हस्तक्षेप करून हा प्रकार बंद करावा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
मडगावच्या नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. मडगावकरांनी निर्भीड रहावे. काँग्रेस पक्ष त्यांच्या हक्कांसाठी लढणार आहे. सामान्य लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आम्ही लवकरच एक विभाग तयार करू. काँग्रेसचे तिन्ही आमदार आता पूर्ण क्षमतेने काम करतील, असे अमित पाटकर म्हणाले.
माझ्याकडे मडगावचे आमदार दिगंबर कामत हे मामलतदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील तलाठी तसेच मडगाव नगरपालीकेच्या कर्मचाऱ्यांवर जन्म दाखले, रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले, भिन्नता प्रमाणपत्र इत्यादींच्या अर्जांवर प्रक्रिया करू नये यासाठी दबाव टाकत असल्याच्या तक्रारी आहेत. जे अर्ज मडगाव मॉडेल ईमेल आयडीवरून अपलोड केले जात नाहीत ते अर्ज तसेच ठेवावेत असे निर्देश फोन करुन स्थानिक आमदार सरकारी अधिकाऱ्यांना देत असल्याचा प्रकार धक्कादायक आहे, असा दावा अमित पाटकर यांनी केला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशामुळे मडगावच्या गद्दार आणि पक्षांतर करणाऱ्या आमदाराने हे कृत्य केले आहे. मडगावकरांनी काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या पाठीशी उभे राहून पक्षांतर करणाऱ्यांना धडा शिकवला. आतातरी दिगंबर कामत यांनी पराभवातून धडा घेऊन घाणेरडे खेळ खेळणे बंद केले पाहिजेत, असे अमित पाटकर म्हणाले.
जवळपास 35 वर्षे राजकारणात घालवलेले स्थानिक आमदार एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन स्वत:च्या मतदारांची छोटी-मोठी कामे रोखत आहेत, हे धक्कादायक आहे. मडगावकरांना त्रास दिल्याने त्यांना परत एकदा जोरदार फटका बसेल, असा इशारा अमित पाटकर यांनी दिला आहे.