भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या फॉरेन बँकांमध्ये 54 कोटीच्या ठेवी : मिशेल रिबेलो
मडगाव :
सिंगापूर बँकेत 50 कोटी आणि पोर्तुगाल बँकेत 4 कोटी भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे यांनी ठेवले आहेत. पण कारगिल युद्धातील सैनीक कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी पोर्तुगालमध्ये स्थायिक व्हावे, अशी भाजप नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. काहीही झाले तरी काँग्रेसचे उमेदवार भारतातच राहतील आणि संसदेत दक्षिण गोव्याचे प्रतिनिधित्व करतील, असा सणसणीत टोला काँग्रेस नेत्या आणि जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी हाणला आहे.
भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवाराने उमेदवारी दाखल करताना प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या माहितीचा आधार घेत काँग्रेस नेत्या मिशेल रिबेलो यांनी भारत मातेच्या सैनिकाचा अपमान केल्याबद्दल भाजपवर टीका केली आहे.
भाजप त्यांच्या दुटप्पी धोरणाने आता पूर्णपणे उघडा पडला आहे. त्यांनी खोटे सांगून लोकांचा विश्वासघात केला आहे. एके काळी ते “स्वदेशी” चा प्रचार करत होते. मला वाटते की भाजपने आता या स्वदेशीला पूर्णविराम दिला आहे, असे मिशेल रिबेलो म्हणाल्या.
भाजपचे श्रीमंत आणि धनाड्यांप्रतीचे प्रेम उघड आहे. त्यांनी दक्षिण गोव्यातील उमेदवाराची निवड केवळ तिच्या संपत्तीमुळे केली. भाजपने स्थानिक कष्टकरी महिला कार्यकर्त्यांना दक्षिण गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी नाकारली, असे मिशेल रिबेलो यांनी सांगितले.
देव महान आहे आणि सत्याचा नेहमी विजय होतो. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच उमेदवाराने विदेशी बँकांमध्ये ठेवलेल्या निधीवर त्यांच्या नेत्यांकडे स्पष्टिकरण मागणे गरजेचे आहे. हा भाजपचा मेक इन इंडिया आहे का? असा सवाल मिशेल रिबेलो यांनी विचारला आहे.