… तर मी मंत्रिपद सोडण्यास तयार : PWD मंत्री
मडगाव :
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंजूर झालेल्या कामांना वित्त खात्याकडून मंजुरी मिळण्यास जो उशीर होतो त्यावर खुद्द मंत्री नीलेश काब्राल यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. अशी दिरंगाई सुरू राहिल्यास आपल्याला हे खातेच नको, असे त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सांगितले आहे.
साकोर्डा येथे बांधलेल्या स्मशानभूमीचे उद्घाटन करताना सोमवारी त्यांनी ही नाराजी जाहीररीत्या व्यक्त केली. ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे जी कामे हातात घेतली जातात ती वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. मात्र खात्यातील प्रशासकीय पद्धतीमुळे ती रेंगाळत आहेत. ही पद्धतच बदलण्याची गरज काब्राल यांनी व्यक्त केली.
प्रशासकीय पद्धत अत्यंत किचकट असून, ती त्वरित बदलून सोपी सुटसुटीत पद्धत सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माझ्या खात्यातील कामे मला पाहिजे त्या प्रमाणे करता येत नसतील तर मी या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे, असे काब्राल म्हणाले.