गोवा

वाळपईतील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद प्रभू काँग्रेसमध्ये…

वाळपई : सामाजिक कार्यकर्ते आणि विविध जनआंदोलनांमध्ये सक्रिय असलेले मिलिंद प्रभू यांनी रविवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उसगाव येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, कार्याध्यक्ष एम. के. शेख, आमदार कार्लोस आल्वारेस फेरेरा, उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मंगलदास नाईक, अॅड. शशांक नार्वेकर, गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतीक्षा खलप, युवक काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक, गोवा सेवा दलाचे प्रमुख राजन घाटे तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी गिरीश चोडणकर यांनी मिलिंद प्रभू यांचा पक्ष सदस्यत्व अर्ज स्वीकारला. त्यानंतर काँग्रेसचा ध्वज देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

प्रभू यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना गिरीश चोडणकर म्हणाले की, समाजहितासाठी सातत्याने काम करणाऱ्या आणि जनतेच्या प्रश्नांवर सक्रियपणे लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या प्रवेशामुळे वाळपई विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस संघटनेला बळ मिळेल. त्यांच्या माध्यमातून पक्षाचा जनाधार आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माणिकराव ठाकरे, डॉ. अंजली निंबाळकर, एम. के. शेख आणि कार्लोस आल्वारेस फेरेरा यांनीही प्रभू यांचे स्वागत केले. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे उसगावसह संपूर्ण वाळपई मतदारसंघात काँग्रेसची संघटना अधिक सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले. लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर मिलिंद प्रभू यांनी समाजसेवा, लोकहित आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले. वाळपईसह संपूर्ण गोव्यात काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

मिलिंद प्रभू यांच्या पक्षप्रवेशामुळे वाळपई विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!