भारत-यूके करारामुळे गोव्यातील उत्पादनांना निर्यातीची मोठी संधी : मुख्यमंत्री
पणजी : भारत आणि युनायटेड किंग्डम (यूके) यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे गोव्यातील उत्पादने विनाशुल्क यूकेमध्ये निर्यात करण्याचा मार्ग खुला झाला असून, राज्यातील एमएसएमई उद्योजक, मत्स्योद्योग आणि शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. तसेच राज्यातील आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
पणजी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्व आयटीआय आता आयएसओ प्रमाणित असून आधुनिक अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. आठवी व दहावीनंतर आयटीआय पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी व बारावी समकक्ष प्रमाणपत्र दिले जात असून, दहा वर्षांहून अधिक काळ कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कायम केले जाईल.
प्रदर्शनात विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती नागरिकांनी खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात माजी न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी वाढत्या रस्ते अपघातांबाबत चिंता व्यक्त करत हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर, वाहतूक नियमांचे पालन आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे टाळण्याचे आवाहन केले. नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. गोव्याला ‘शून्य अपघात राज्य’ बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे गोव्यातील स्थानिक उद्योग, मत्स्योद्योग आणि कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील उद्योजकांनी निर्यात वाढवून या कराराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.







