
पणजी :
गोव्यातील कॅथलिक भाविकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या वेळंकणी येथे ‘गोवा निवास’ उभारण्याच्या प्रस्तावाला तमिळनाडू सरकारने तत्त्वतः सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांची भेट घेऊन हा विषय मांडला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पासाठी योग्य जागेची पाहणी करून प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
तमिळनाडूचे पर्यटनमंत्री तथा काँग्रेस आमदार राजेश कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन्ही राज्यांतील समन्वय, सामाईक किमान कार्यक्रम आणि विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी चोडणकर यांनी दरवर्षी वेळंकणी येथील आवर लेडी ऑफ गुड हेल्थ देवस्थानाला भेट देणाऱ्या हजारो गोमंतकीय भाविकांना परवडणारी, सुरक्षित आणि सोयीची निवासव्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी गोवा निवास उभारण्याची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता देत पर्यटनमंत्र्यांना योग्य जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच गोवा निवास उभारला जाईपर्यंत तमिळनाडू पर्यटन विभागामार्फत गोमंतकीय भाविकांसाठी निवासव्यवस्थेचा पर्याय उपलब्ध करून देण्याचाही विचार करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे काँग्रेसने सांगितले.
याबद्दल समाधान व्यक्त करताना गिरीश चोडणकर यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून वेळंकणी येथे गोवा निवास उभारण्याचे दीर्घकाळचे स्वप्न लवकरच साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.







