”हा’ कायदा करून विधानसभेने महिलांना अमानवी वागणुकीतून मुक्त करावे’
पणजी:
WE (वगळता कशाला) या सामाजिक संस्थेने चाळीसही आमदारांना, भेदभावपूर्ण विधवा प्रथा बंद करण्यासाठी च्या 31 मार्च रोजी विधानसभेत चर्चेसाठी येणाऱ्या खाजगी सदस्य ठरावाला एकमताने पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
जर आमदारांनी हा ठराव एकमताने एकमताने मंजूर केला आणि महिलांचा मूलभूत मानवी हक्क पायदळी तुडवणाऱ्या या प्रथा बंद केल्या तर गोवा विधानसभेचे नाव इतिहासात सर्वात पुरोगामी आणि पथदर्शक विधानसभा म्हणून नोंदवले जाईल.
“WE च्या सदस्यांनी आजपर्यंत गोव्यातील हजारो विधवांशी संवाद साधला आहे. त्यांची या संदर्भातली दशा कमी अधिक प्रमाणात, सर्वच धर्म, जात, पंथांमध्ये सर्वत्र सारखीच आहे. तिच्या पतीचा मृत्यू झाल्यापासून ते स्वतःच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक विधवेला भेदभाव, सामाजिक अपमान आणि कधीकधी छळ आणि मानसिक अवहेलनानांहि सामोरे जावे लागते. गोव्याच्या अनेक भागांमध्ये अंत्यसंस्काराच्या वेळी पाळल्या जाणार्या प्रथांमुळे पतीच्या मृत्यूमुळे अगोदरच अर्धमेली झालेल्या तिला अतिशय त्रास सहन करावा लागतो,” असे WE चे म्हणणे आहे.
“हा भेदभाव थांबवल्याने समाजाचे कोणतेही नुकसान किंवा हानी होणार नाही, उलट विधवा म्हणून टॅग झालेल्या महिलेला नवीन जीवन मिळेल. 2011 च्या जनगणनेनुसार गोव्यात 77,000 पेक्षा जास्त विधवा होत्या. गेल्या 12 वर्षांत लोकसंख्या वाढल्याने हा आकडा एक-दोन लाखांच्या पुढे गेला असावा. जर समाजाने त्यांच्याबद्दल थोडा सहसंवेदनापूर्वक विचार करण्याचे ठरवले तर या सर्व महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता येतील,” असे WE ने पुढे ठासून सांगितले.
“बालविवाह प्रथा, जातीच्या आधारावर भेदभाव, इत्यादी परंपरा, ज्यांना एकेकाळी अपरिहार्य मानले जात होते त्या संबंधित कायद्यांच्या निर्मितीमुळे आणि अंमलबजावणीमुळे मोठ्या प्रमाणात कालबाह्य किंवा कमी झाल्या आहेत. या प्रथा दूर केल्यामुळे लाखो लोकांचे जीवन सकारात्मक पद्धतीने बदलले आहे. विधवा भेदभावाशी संबंधित कायदा देखील असाच परिणाम साधू शकतो,” असे “WE” चे मत आहे.
“अंत्यसंस्काराच्या वेळच्या प्रथांची तिव्रता प्रत्यक्षांत कमी अधिक असली तरी, विधवेला समाज मोठ्या प्रमाणात अत्यंत असंवेदनशील वागणूक देतो. विधवांनी पूर्वनिर्धारित पद्धतीने कपडे परिधान करणे अपेक्षित असल्याने, जेव्हा त्या समाजात बाहेर पडतात तेव्हा त्यांची वैवाहिक स्थिती स्पष्ट होते. दुर्दैवाने,विधुर पुरूषांच्या बाबतीत असे होताना दिसत नाही,”
“विधवेला आजीवन भेदभाव सहन करावा लागतो, विशेषत: धार्मिक कार्यक्रम आणि कौटुंबिक समारंभात. तिची उपस्थिती अशुभ मानली जाते आणि तिला बाजूला केले जाते. रूढी आणि विधींच्या नावाखाली तिला वाईट वागणूक दिली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्यांच्यासाठी तिने आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केलेले असते, असे तिच्या जवळचे आणि जिवलग कुटुंबीय, आणि समाज तिच्यावर होणाऱ्या या अन्यायाविषयी दुर्लक्ष करत असतो. ती भावनिक आणि मानसिक वेदना स्वतःच सहन करते,” अशी WE ने माहिती दिली.
” ती वयाने कितीही लहान असली तरीहि, तिच्या नावाला अशुभ टॅग जोडल्यामुळे पुनर्विवाहाची दारे तिच्यासाठी उघडी असतातच असे नाही. तीची कोणतीही चूक नसताना आपल्या बरोबरच्या माणसाचा होणारा हा अवाजवी छळ थांबवण्याची वेळ आली आहे. समाजाने भेदभाव थांबवला पाहिजे आणि त्यांचे पती जिवंत असताना त्यांना जो सन्मान दिला जात होता तोच सन्मान आणि दर्जा नंतरही तिला दिला पाहिजे,” असे WE चे मत आहे.
“सुधारणा आणि योग्य जनजागृतीमुळे समाजात गेल्या अनेक वर्षांपासून रुजलेल्या या भेदभावपूर्ण प्रथांचा अंत होऊ शकतो. एखादा कायदा किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यातील सुधारणा हा एक मोठा प्रतिबंधक उपाय म्हणून काम करेल. याशिवाय, बहुसंख्य लोक ज्यांना या प्रथांची निरर्थकता समजली आहे परंतु तरीही रूढींच्या नावाने ते चालू ठेवत आहेत, कायदेशीर तरतुदी त्यांना अशा प्रथांपासून दूर राहण्यास सक्षम करेल. कारण ते बेकायदेशीर असल्याचे सांगणे सुलभ होईल, अशी आशा “WE” ने व्यक्त केली.
गोव्याच्या अनेक भागांमध्ये प्रचलित असलेल्या अंत्यसंस्काराच्या वेळच्या प्रथांप्रमाणे काही धर्मांमध्ये, मृत व्यक्तीच्या पत्नीला तिच्या पतीच्या शवाजवळ, घराच्या उंबरठ्यावर बसवले जाते. नातेवाईक, शेजारी आणि जवळचे आणि प्रियजन तिच्या डोक्यात फुलांचे ढीग आणि कपाळावर ‘शेवटच्या वेळी’ सिंदूर अथवा कुंकू लावतात. अत्यंत दु:खात असलेल्या स्त्रिच्या वैवाहीक चिन्हे असलेल्या गोष्टी, आजूबाजूचे पुरुष किंवा स्त्रिया अक्षरशः ओरबाडून काढतात. फुले, मंगळसूत्र, पायातले जोडवी, इतर दागिने ओरबाडुन काढुन त्या शवावर घालतात. तिला हात आपटून बांगड्या फोडायला लावल्या जातात किंवा काही प्रसंगी तिच्या बांगड्या इतर लोकं फोडतात. तिच्या डोक्यावर थंड पाण्याची घागर रिकामी केली जाते.
काही धर्मात शोकाकुल स्त्रीला तिच्या पतीच्या शवपेटीवर हातात भरलेल्या बांगड्या फोडायला लावल्या जातात. फुले ओरबाडली जातात. लाल साडी परिधान करुन तिला स्मशानापर्यंत नेले जाते. काही धर्मात तिला तीन दिवस एका जागेवर बसायला लावतात. लच्छा काढायला लावतात.
या सगळ्या अघोरी प्रथा करताना ती गरोदर असली, अपाहीज असली, आजारी असली तरी तिची गय केली जात नाही. अशा अमानवी प्रथा बंद करण्यास विधानसभेतील समस्त बंधुभगिनिनी ठोस कार्यवाही करावी अशी विनंती “WE” ने समस्त पिडीत व इतर महिलांच्या वतीने केली आहे.