‘शिक्षण आणि मंदिरांजवळ दारूच्या दुकानांना परवानगी देणारी अधिसूचना मागे घ्या’
मडगाव :
भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परवाना शुल्क वाढवून शैक्षणिक संस्था आणि धार्मिक स्थळांच्या 100 मीटर परिसरात दारू दुकानांना परवानगी दिल्याने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होणार आहे. दिवाळखोर भाजप सरकारने काटकसरीचे उपाय अवलंबून इव्हेंट आयोजनावर होणारा फालतू खर्च बंद करावा, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
दारूच्या दुकानांना शिक्षण आणि श्रद्धेच्या मंदिराजवळ येण्याची परवानगी देणारी अधिसूचना त्वरित मागे घेण्याची माझी मागणी आहे. या ठिकाणांचे पावित्र्य नेहमीच जपले जाणे आवश्यक आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
परवाना शुल्कात वाढ करून शैक्षणिक संस्था आणि धार्मिक स्थळांच्या 100 मीटरच्या आत दारू दुकानांना परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे तरुणांचे भविष्य आणि गोव्याची ओळखच उद्ध्वस्त होईल.
भाजप सरकारचे मानसिक संतुलन ढासळल्याचे दिसून येत आहे. “पार्टी विथ अ डिफरन्स” चे सरकार आता सर्व काही वेगळ्या पद्धतीने करत आहे. आमचे स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र आग्वाद तुरूंगाच्या परिसरात मद्यविक्रीला भाजप सरकारने परवानगी दिली. आता शाळा आणि धार्मिक स्थळांच्या भिंतीलगत दारूची दुकाने आणण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. भाजप सरकार पैसे कमावण्यासाठी काहीही करेल, असे युरी आलेमाव म्हणाले.
भाजप सरकार गोव्यातील दारू माफियांना आश्रय देत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत मला उत्तर दिले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या गोव्यातून कर्नाटकात अवैध दारूची वाहतूक केली जाते, या विधानाची सरकारला माहितीच नाही. मला दिलेल्या उत्तरावरून भाजप सरकार दारूच्या अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे हे स्पष्ट होते असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.
शिक्षण आणि श्रद्धा मंदिरांच्या शेजारी दारूच्या दुकानांना परवानगी देऊन महसूल वाढविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा दारूचा अवैध व्यापार थांबविण्यावर सरकारने भर दिला पाहिजे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.