‘निसर्गाला उद्ध्वस्त करणे म्हणजे प्रत्यक्षात जीवन नष्ट करणेच’
गोव्यामध्ये आयोजित 55 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून बोहदान स्लामा या नामवंतांने दिग्दर्शित केलेल्या आणि पेट्र ओक्रोपेक निर्मित “ड्राय सीझन” (शुष्कीचा हंगाम हे मूळ शीर्षक असलेला) या बहुप्रतिक्षित समारोप चित्रपटाविषयी एक वार्ताहर परिषद आयोजित करण्यात आली. पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने या चित्रपटातून अतिशय मार्मिक पद्धतीने पर्यावरणीय आणि अनेक पिढ्यांशी संबंधित आव्हानांचा घेतलेला वेध अधोरेखित केला.
हिरव्यागार शेतांच्या पार्श्वभूमीवरील या कथेत 50 वर्षांचा जोसेफ नावाचा एक शेतकरी, त्याची पत्नी इव्हा आणि त्यांची तीन मुले यांच्यासह एका पर्यायी जीवनशैलीचा शोध घेत आहे. प्रचंड नफ्याची हाव असलेल्या व्हिक्टर नावाच्या कृषी व्यावसायिकाबरोबरचा त्याचा संघर्ष त्या वर्षीच्या उन्हाळ्यात आणखी तीव्र होतो. त्या गावात पिण्यासाठी देखील पाणी शिल्लक राहात नाही आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये ताण निर्माण होतात. त्यातच व्हिक्टरच्या घरी परतलेल्या त्याच्या मुलाबरोबरच्या त्याच्या ताणलेल्या संबंधांमुळे गुंतागुंत आणखी वाढते.
दिग्दर्शक बोहदान स्लामा यांनी मानव आणि पर्यावरण यांच्यातील सार्वत्रिक बंध, मानवी भावनांचे रक्षण करण्याचे प्रतिबिंब म्हणून नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित करत प्रतिबिंबित केले आहेत. या चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली आणि त्यात 11 वेळा सुधारणा केली, असे ही पटकथा लिहिण्याच्या अतिशय अवघड वाटचालीची माहिती देताना दिग्दर्शकाने सांगितले आणि चित्रपट निर्मिती प्रक्रिया अतिशय समृद्ध बनवण्यासाठी परस्पर सहकार्याने केलेल्या प्रयत्नांबद्दल चित्रपटातील कलाकार आणि निर्माते यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली
लहान देशांमध्ये कलात्मक चित्रपटाला भांडवल पुरवण्यात आणि त्याची निर्मिती करण्यात किती अडचणी असतात याची माहिती देताना निर्माते पेट्र ओक्रोपेक यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला. शाश्वतता, कुटुंब आणि पिढ्यांमधील दुरावा यांसारख्या विषयांचा वेध घेत जागतिक प्रेक्षकांना साद घालणाऱ्या या चित्रपटाच्या प्रासंगिकतेची त्यांनी प्रशंसा केली. या चित्रपटातील कथन म्हणजे समकालीन विषयांचे प्रतिबिंब असल्याने आपल्या भविष्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी युवा प्रेक्षकांना केले.
ड्राय सीझन, हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात एका अर्थपूर्ण चर्चेला तोंड फोडेल, प्रेक्षकांना मानवता आणि निसर्ग यांच्यातील अतिशय नाजूक संतुलनाची आठवण करून देईल अशी अपेक्षा या सत्राचा समारोप करताना बोहदान स्लामा यांनी व्यक्त केली.